आपत्काळात देवतेला प्रसन्न कसे करावे ?

उष्टे अन्न आणि त्यासंबंधीच्या आचारधर्माचे पालन !

(भाग ५)

पू. तनुजा ठाकूर

१. धर्माचरण आणि माहिती यांच्या अभावामुळे उष्ट्या अन्नपदार्थांच्या संदर्भात पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने काळजी घेतली न जाणे

‘उष्ट्या अन्नपदार्थांच्या संदर्भात पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने सतत काळजी घ्यायला हवी. सध्या धर्माचरण नसणे, आळशीपणा, ‘खाद्यपदार्थ वाया जाऊ नयेत’, अशी मानसिकता नसणे, तसेच ‘पवित्रते’विषयी काहीही ठाऊक नसणे यांमुळे लोक उष्ट्या अन्नपदार्थांच्या दृष्टीने काळजीच घेत नाहीत. जी व्यक्ती कर्मकांडानुसार साधना करते, उदा. ब्राह्मण, संन्यासी आणि काही पारंपरिक आखाडे अन् मठ यांच्याशी जोडलेले संत हे सर्वजण वरील प्रकारच्या व्यक्तींच्या घरी जेवू इच्छित नाहीत.

२. सामान्य हिंदूंमधील ९५ टक्के लोक आचारधर्माविषयी अनभिज्ञ असणे

आमच्या ‘उपासना’ आश्रमात जे सामान्य हिंदू देश-विदेशातून येतात, त्यांच्यापैकी ९५ टक्के लोक हे आचारधर्माविषयी अनभिज्ञच असतात.

३. लोकांच्या अनभिज्ञतेची लक्षात आलेली काही उदाहरणे

३ अ. मुलाने उष्टावलेला केक महिलेने तसाच शीतकपाटात ठेवून देणे : वर्ष २०१४ मध्ये मी इटलीत एका हिंदु महिलेच्या घरी रहात होते. एके दिवशी तिने ‘केक’ बनवला होता. तिच्या मुलाने केकच्या एका तुकड्याचा काही भाग खाऊन तो उष्टा तुकडा ताटात तसाच ठेवला. महिलेने ते ताट तसेच शीतकपाटात (फ्रिजमध्ये) ठेवले. याविषयी विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘त्यात काय बिघडले ? आपणच तर तो खाणार आहोत, नाही तर तो पूर्ण केक वाया जाईल.’’

३ अ १. शीतकपाटात उष्टे अन्न ठेवल्यास त्यातील अन्य खाद्यपदार्थही अशुद्ध आणि अपवित्र होणे : जर तुम्हीसुद्धा असे करत असाल, तर लक्षात ठेवा, शीतकपाट हेसुद्धा एक प्रकारचे भांडारच आहे. ते अशुद्ध झाल्यामुळे त्यात ठेवलेले सर्व खाद्यपदार्थ अशुद्ध आणि अपवित्र होतात. त्यात ठेवलेल्या कोणत्याही पदार्थाचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकत नाही, तसेच कर्मकांडानुसार साधना करणाऱ्या साधकाला ते खाण्यासाठी देऊ शकत नाही. संतांना तर यातील काहीच देऊ शकत नाही.

३ आ. घरातील प्रमुखाने स्वतःच्या ताटातील पोळी घरी आलेल्या संतांच्या ताटात वाढणे : वर्ष २०१२ मध्ये धर्मप्रसारानिमित्त मी देहलीतील एका साधकाच्या घरी थांबले होते. एके दिवशी त्यांच्या घराचे प्रमुखही माझ्यासमवेतच जेवत होते. त्यांच्या पत्नीने त्यांना गरम पोळी आणून वाढली. माझ्या ताटातील पोळी संपत आल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी स्वतःच्या उष्ट्या ताटातील पोळी माझ्या ताटात वाढली.

३ इ. उत्तर भारतातील बहुतांश लोक दोन्ही हातांनी पोळी तोडत असणे आणि शेष राहिलेले उष्टे पदार्थ त्यांनी पुन्हा शीतकपाटात तसेच ठेवून देणे : पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपद्धत असल्याने घरातील आजी, आई किंवा मोठी बहीण याच सर्वांना जेवण वाढायच्या. सध्या सर्वत्र विभक्त कुटुंबपद्धत अस्तित्वात असल्यामुळे सर्वजण एकाच वेळी जेवणाच्या पटलावर (‘डायनिंग टेबल’वर) जेवतात. उत्तर भारतात, विशेषतः पंजाब आणि देहली येथील लोक जेवतांना दोन्ही हातांनी पोळी तोडतात. त्यामुळे त्यांचे दोन्ही हात उष्टे होतात. त्यानंतर ते त्याच उष्ट्या हातांनी पोळी, वरण (आमटी) किंवा भाजी वाढून घेतात आणि दुसऱ्यांनाही वाढतात. मग कुणी संत जेवायला आले असले, तरी त्यांना तशाच उष्ट्या हातांनी वाढले जाते. शेष राहिलेले उष्टे पदार्थ पुन्हा शीतकपाटात ठेवून दिले जातात.

४. आचारधर्माचे पालन न करणाऱ्या हिंदूंकडील जेवण कुणीही जेवत नसल्याने ते पशूला देण्याच्याच लायकीचे होणे

उष्ट्या अन्नपदार्थांच्या संदर्भात अनेक हिंदू आचारधर्माचे पालन करत नाहीत. तरीही ते म्हणतात, ‘‘पितृपक्षाच्या वेळी ब्राह्मण भोजनासाठी कुणी येतच नाही. ताटात पदार्थ भरून ते ब्राह्मणांकडे पाठवले, तरी ते पदार्थ ब्राह्मण एकतर कुत्र्याला खाऊ घालतात किंवा फेकून तरी देतात.’’ आता असे भोजन कुणीही कर्मकांडी पंडित एखाद्या पशूलाच खायला घालणार ना ! असे अशुद्ध भोजन देवता आणि पूर्वजही ग्रहण करणार नाहीत. मग धर्मनिष्ठ ब्राह्मण कसे बरे ते ग्रहण करू शकतील ? त्यांनासुद्धा आपल्या धर्माचे रक्षण करून तो टिकवायचा आहे.

५. कुसंस्कारांच्या प्रभावामुळे महिलांना पवित्र आणि अपवित्र यांतील भेद न समजणे

मी गेली १२ वर्षे भारत आणि विदेशात अनेक हिंदूंच्या घरी धर्मप्रसारानिमित्त राहिले आहे. त्या कालावधीत असे अनेक प्रकार पाहिले आहेत. मी संबंधित महिलांना याविषयी सांगायचे; पण त्यांच्यावरील कुसंस्कारांच्या प्रभावामुळे त्यांना पवित्र आणि अपवित्र यांतील भेदच समजत नाही.

६. हस्तप्रक्षालन पात्रात भांडी घासतांना कोणती काळजी घ्यावी, याचे सामान्यज्ञान काही महिलांना नसणे

सध्या उष्टी भांडी धुण्यासाठी अन्नपूर्णाकक्षात हस्तप्रक्षालन पात्र (बेसिन) असते. उष्टी ताटे त्यात ठेवलेली असतात. अनेक स्त्रिया तांदूळ किंवा डाळ धुण्यासाठी त्यावर एक पात्र धरतात आणि नंतर तेच पात्र अन्न शिजवण्यासाठी शेगडीवर ठेवले जाते. जेव्हा महिला उष्टी भांडी घासतात, तेव्हा काही वेळा त्याचे शिंतोडे किंवा साबणाचे थेंब हे शेजारी ठेवलेल्या शिजवलेल्या खाद्यपदार्थांत पडतात; कारण शहरांमध्ये अन्नपूर्णाकक्ष लहानच असतात. काही महिलांना शिजवलेले खाद्यपदार्थ हे भांडी घासण्याच्या जागेपासून थोड्या दूरवर ठेवावेत, इतकेही सामान्यज्ञान नसते. त्यातच घरकामे करणारी महिला आल्यावर ती सर्व ‘पवित्रं-पवित्रं’ करून निघून जाते.

बिचारी गृहिणी आपली दोन मुले आणि पतीचे जेवण सर्व आधुनिक यंत्रांच्या माध्यमातून बनवून एवढी थकलेली असते की, जर तिने ३-४ घंटे दूरचित्रवाणी (टीव्ही) किंवा भ्रमणभाष पहाण्यासाठी दिले नाहीत, तर तिला निराशाच येईल !

७. गृहिणींनो, ‘पवित्रता’ या गुणाचे महत्त्व लक्षात घ्या !

गृहलक्ष्मीची अशी वृत्ती असणाऱ्या घरात अन्नपूर्णामाता रहाणार तरी कशी ? महिलांनो, ‘पवित्रता’ हा आमच्या हिंदु धर्मातील सुसंस्कारांचा केंद्रबिंदू आहे. त्याचे पालन केल्यावरच तुमच्या घरात सात्त्विकता किंवा देवत्व निर्माण होणार आहे. हा गुण आपण स्वतः आत्मसात करून मुलांवरही बिंबवावा !

(‘उष्टे अन्न ग्रहण का करू नये ?’, याविषयी अधिक माहिती हवी असल्यास सनातन संस्था निर्मित ‘आहार आणि आचारधर्म’ यांच्याशी संबंधित ग्रंथ वाचावेत.)

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (३१.१.२०२२)