सनातन संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा काळ !

केरळचे राज्यपाल अरिफ महंमद खान

केरळचे राज्यपाल अरिफ महंमद खान यांनी ७ मे या दिवशी एका शाळेच्या उद्घाटनप्रसंगी केलेले एक विधान अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मुसलमानांसह समस्त पुरोगामी हिंदूंनीही धडा घेण्यासारखे आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘‘भारताच्या प्राचीन संस्कृतीचे पुनरुज्जीवन आणि सनातन धर्माच्या तत्त्वांचे पुनर्संचयन देशात योग्य शिक्षण देऊन करायला हवे.’’ शहाबानो प्रकरणाच्या वेळी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेले अरिफ खान यांनी त्यागपत्र दिले होते. अरिफ खान यांना एक विवेकशील मुसलमान विचारवंत म्हटले, तर वावगे होणार नाही. काळाच्या ओघात हिंदु संस्कृतीचे संभाव्य पुनरुज्जीवन होण्याच्या दृष्टीने ज्या काही घडामोडींना सध्या वेग येत आहे, त्या पार्श्वभूमीवर काळाची पावले ओळखून खान यांनी केलेले वरील विधान हे अत्यंत अर्थपूर्ण आहे. त्यामागे मोठा गर्भित अर्थ दडला आहे. त्यामुळे सनातन संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा अभ्यासक्रम शिकवण्याविषयी एका मोठ्या पदावरील मुसलमान धर्मीय व्यक्ती सांगत आहे. त्याविषयी मुसलमान समाजाने गांभीर्याने घेऊन स्वतःची वृत्ती, तसेच हिंदु धर्म आणि धर्मीय यांच्याकडे पहाण्याचा दूषित दृष्टीकोन पालटला, तर पुढील काळात ते चांगले जीवन जगू शकतात.

परिवर्तनाचे साक्षीदार !

आज संकुचित झालेला भारत पृथ्वीवरील अनेक देशांपैकी एक म्हणून दिसत असला, तरी एकेकाळी संपूर्ण पृथ्वीवर अधिराज्य गाजवणारी ही एकमेव संस्कृती होती. याचे संदर्भ पुराव्यांसहित पाठ्यक्रमात एकदा आले की, साहजिकच ‘आजच्या जगातील दोन मोठ्या पंथांचे पूर्वज या सनातन संस्कृतीचाच भाग होते’, हे वेगळे सिद्ध करण्याची आवश्यकता रहाणार नाही. आजही काही राष्ट्रनिष्ठ मुसलमान ही गोष्ट उघडपणे सांगण्याचे धैर्य करतात की, त्यांचे पूर्वज हिंदूच होते. मुसलमान ही गोष्ट लक्षात घेऊ लागले, तर ‘हिंदूंविषयी वैरभाव बाळगणे किती निरर्थक आहे’, हे त्यांच्या सहज लक्षात येऊ शकते; अर्थात् त्यांच्या कट्टर धार्मिक नेत्यांना हीच गोष्ट गेली शतकानुशतके होऊ द्यायची नाही. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतरही काँग्रेसशी संधान साधून त्यांनी ते होऊ दिले नाही. स्वामी विवेकानंद, पू. गोळवलकरगुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी हिंदु नेत्यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्रा’चा उल्लेख इतिहासातून जाणीवपूर्वक पुढे येऊ दिला गेला नाही. हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून १० वर्षांपूर्वी ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाचा पुन्हा उद्घोष भारतात चालू झाला आणि गेल्या ३ वर्षांत हिंदूंचे धर्मगुरु, संत-महंत, सहस्रो हिंदुत्वनिष्ठ आणि लक्षावधी हिंदू यांच्या मनामनांत त्याने आकार घ्यायला आरंभ केला.

परिवर्तनाचा परिणाम

या परिवर्तनाचा एक परिणाम म्हणजे गेल्या काही दिवसांत हिंदूंची श्रद्धास्थाने आणि कलेची अत्युच्च प्रतिके असलेल्या ज्या स्थानांवर मुसलमानांनी आक्रमण केले आहे, त्याविषयी ठिकठिकाणचे हिंदुत्वनिष्ठ उघडपणे बोलू लागले. पूर्वी ज्या गोष्टी बोलणेही जणू गुन्हा असल्याप्रमाणे अत्यंत दबक्या आवाजात बोलल्या जात आणि माध्यमे तर त्याची कधीच नोंद घेत नसत, अशा सर्व गोष्टी आता अत्यंत मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. ‘१ सहस्र स्त्रियांचा जनानखाना बाळगणारा, ८ ‘निकाह’ करणारा आणि मुमताजच्या प्रेमात पडूनही (?) पहिला निकाह दुसऱ्या स्त्रीशी करणारा आणि १४ वर्षांच्या वैवाहिक जीवनात मुमताजवर १४ बाळंतपणे लादून १४ व्या बाळंतपणात तिला मृत्यूच्या खाईत ढकलणारा’ शहाजहान बादशहा होता. त्यामुळे ताजमहालला ‘शहाजहान आणि मुमताज यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणणे हास्यास्पद आहे’, हा सत्य इतिहास काँग्रेसने भारतीय विद्यार्थ्यांपासून लपवून ठेवला. प्रसिद्ध इतिहास संशोधक पुरुषोत्तम नागेश ओक यांनी ‘मुमताजचे शव बुऱ्हानपूर येथे पुरले होते आणि ताजमहालच्या खाली शिवपिंड आहे’, हे सांगून ‘तेजोमहालय’च्या अस्तित्वाचे १०८ पुरावे दिले. ते देऊनही अनेक वर्षे लोटली; पण आतापर्यंत त्याला शासकीय किंवा न्यायालयीन अशी अधिकृत मान्यता मिळाली नाही. आता हिंदू त्याविषयी जागृत झाले आहेत. त्यामुळे काशी विश्वेश्वराप्रमाणे लवकरच त्याचे सत्यही जगजाहीर होईल. कुतूबमिनार ‘विष्णुस्तंभ’ असल्याचे आणि आगऱ्याचा लाल किल्ला ‘हिंदु भवन’ असल्याचे अनेक हिंदूंना ठाऊक आहे; पण ‘त्याविषयी काय करायचे ?’, हे कुणाला लक्षात येत नव्हते; मात्र ‘राममंदिराच्या न्यायालयीन लढ्याच्या भव्य आणि अद्वितीय यशानंतर काशी अन् मथुरा आक्रमणमुक्त होण्याचे दिवस जवळ येऊ शकतात’, हे हिंदूंना लक्षात आले. ‘मशिदींवरील सहस्रो भोंगे उतरवले जातील’, असे दोन मासांपूर्वी कुणी सांगितले असते, तर कुणाला खरे वाटले नसते; पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदूंना आवाहन केले काय आणि बहुतांश ठिकाणी मुसलमानांच्या नेत्यांनी त्यांना नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले काय ! जे वर्षानुवर्षे झाले नाही, ते अत्यल्प कालावधीत झाले. हिंदूंच्या महान सनातन संस्कृतीचे पुनरुज्जीवन आता अशाच प्रकारे जलद गतीने होण्याची चिन्हे दिसत आहेत. आज प्राचीन मंदिरे आणि मूर्तीकलेच्या माध्यमातून अबाधित असलेल्या सनातन भारतीय संस्कृतीत अत्यंत प्रगत ज्ञान-विज्ञान कसे अस्तित्वात होते, यावर मोठे संशोधन होत आहे. तमिळनाडूतील कुंदमवादकुनाथस्वामी मंदिरात ‘शुक्राणू आणि अंडाणू यांचे मीलन’, पोटातील गर्भाच्या विविध अवस्था, गर्भ बाहेर येण्याची वेळ आदी विषयांवरील विस्तृत शिल्पकला आहे. जी गोष्ट केवळ ‘एक्स् रे’ यंत्रातून कळू शकते, ती ऋषिमुनींना माहिती होती, हेच यातून सिद्ध होते. हरियाणात ५ सहस्र वर्षांपूर्वीची दागिने बनवण्याच्या मोठ्या व्यवसायाची जागा नुकतीच मिळणे किंवा तमिळनाडूत ४ सहस्र २०० वर्षांपूर्वी लोखंड वापरले जात असल्याचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी विधीमंडळात सांगणे यांसारख्या गोष्टी हिंदु संस्कृतीची महानता पुन:पुन्हा सिद्ध करत आहेत. असे असतांना अरिफ खान यांना ‘हीच गोष्ट योग्य शिक्षणाद्वारे शिकवली गेली पाहिजे’, असे वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे !

हिंदु ज्ञान संस्कृतीचे पुनरुज्जीवन होण्याचा काळ चालू झाला आहे, हे लक्षात घ्या !