९.५.२०२२ या दिवशी च्या अंकात भागात आपण ‘कै. रवींद्र आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग झाल्यावर उद्भवलेली कठीण परिस्थिती’ यांविषयी पाहिले. संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय, औषधोपचार आणि सातत्याने होत असलेली गुरुकृपा यांमुळे कै. रवींद्र कोरोनातून मुक्त झाले होते; मात्र पुढे दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. ९ मे २०२२ या दिवशी त्यांचे वर्षश्राद्ध झाले. त्यानिमित्त कै. रवींद्र यांच्या आजारपणात त्यांच्या पत्नीने अनुभवलेली गुरुकृपा पाहुया.
५. पू. पात्रीकरकाकांनी त्यांच्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातही आम्हाला नामजपादी उपाय सांगून आध्यात्मिक स्तरावर बळ देणे
पू. पात्रीकरकाकांनी त्यांच्या अत्यंत व्यस्त अशा दिनक्रमातही प्रत्येक प्रसंगात आम्हाला (मी आणि यजमान दोघांनाही) नामजपादी उपाय सांगून आध्यात्मिक स्तरावर बळ दिले आणि मार्गदर्शनही केले. त्यामुळे परात्पर गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) सतत आमच्या समवेत आहे आणि ‘जे होईल, ते चांगलेच होईल’, असा विश्वास माझ्या मनात निर्माण झाला. माझ्याकडून सातत्याने गुरुचरणी ‘मला वर्तमानकाळात रहाता येऊ दे आणि समोर येईल ती परिस्थिती स्वीकारता येऊ दे’, अशी प्रार्थना होत असे. मध्येच एखाद्या प्रसंगामुळे ताण आला, तरी गुरुकृपेने मला ती परिस्थिती हाताळता येत असे.’
६. यजमानांना कोरोनाचा संसर्ग नसल्याचा अहवाल येणे; मात्र ‘व्हेंटिलेटर’ काढल्यावर त्यांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होणे, त्यामुळे ‘व्हेंटिलेटर’ उपलब्ध असलेल्या दुसऱ्या ‘नॉन-कोविड’ रुग्णालयात हालवण्याचा निर्णय घेणे
१४.५.२०२१ या दिवशी आधुनिक वैद्यांनी यजमानांची कोरोनाची पुन्हा चाचणी केली; मात्र गुरुकृपेने त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचा अहवाल आला, तरी त्यांना प्राणवायू बाहेरून द्यावा लागत होता. ‘व्हेंटिलेटर’ (प्राणवायू पुरवणारे यंत्र) काढल्यावर त्यांना श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता. त्यासंदर्भात आधुनिक वैद्यांशी बोलल्यावर ते म्हणाले, ‘‘कोरोनानंतरची चिकित्सा केली, तर त्यांना ८ – १० दिवसांत बरे वाटू शकेल. त्यांना कोविड रुग्णालयातून अन्य रुग्णालयात हालवा.’’ या सकारात्मक घडामोडी ऐकल्यानंतर श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली. ‘गुरुमाऊलीच आपल्याला सांभाळत आहे’, याची मला प्रचीती आली.
७. ‘नॉन-कोविड’ रुग्णालयात सामान्य रुग्णांसाठी ‘व्हेंटिलेटर’ची खाट २ दिवस उपलब्ध न होणे, नंतर एका ‘मल्टिस्पेशालिटी’ रुग्णालयात खाट उपलब्ध होणे
‘नॉन-कोविड’ रुग्णालयात यजमानांना हालवायच्या आधी सर्व गोष्टी पू. पात्रीकरकाकांच्या कानावर घालून त्यांचे मार्गदर्शन घेतले. तसेच रामनाथी, गोवा आश्रमातील आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांच्याशी बोलून आम्ही इतर रुग्णालयात ‘व्हेंटिलेटर’ असलेली खाट उपलब्ध आहे का ?’, याचा शोध घेतला. ‘५ – ६ रुग्णालयांत विचारपूस केल्यानंतर सामान्य किंवा इतर रोगांच्या रुग्णांसाठी ‘व्हेंटिलेटर’ची व्यवस्था मिळणे सध्या अशक्य आहे’, असे आमच्या लक्षात आले. यात २ दिवस गेले. पुन्हा श्री गुरुचरणी आर्त प्रार्थना झाली, ‘पुढील चिकित्सेविषयी जे योग्य असेल, त्याप्रमाणे होऊ दे.’ येथेही श्री गुरुमाऊली साहाय्यासाठी धावून आली आणि ‘एका ‘मल्टिस्पेशालिटी’ रुग्णालयात (सर्व प्रकारच्या आजारावर उपचार होऊ शकणाऱ्या रुग्णालयात) खाट उपलब्ध होऊ शकते’, असे आम्हाला कळले. गुरुकृपेने रुग्णालयातील आधुनिक वैद्यांनीच रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना नेण्याची अडचण सुटली. प्रत्येक वेळी ‘सर्व सूत्रे गुरुदेवांच्या हातात आहेत’, याची जाणीव होऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
८. ‘मल्टिस्पेशालिटी’ रुग्णालयाच्या उद्वाहिकेत असतांनाच कै. रवींद्र यांची हृदयक्रिया बंद पडणे; परंतु आधुनिक वैद्यांनी अथक प्रयत्नांनी ती चालू करणे
‘मल्टिस्पेशालिटी’ रुग्णालयात पोचल्यावर उद्वाहिकेत (लिफ्टमध्ये) असतांनाच यजमानांची हृदयक्रिया बंद पडली. त्या रुग्णालयातील सर्वच आधुनिक वैद्यांनी उद्वाहिकेतच त्यांच्यावर उपचार केले आणि बंद पडलेली हृदयक्रिया पुन्हा चालू झाली ! पू. पात्रीकरकाकांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सर्वच कुटुंबीय नामजपादी उपाय करत होतो.
९. कै. रवींद्र यांचे झालेले निधन !
९ अ. दुसऱ्या दिवशी दिरांनी ‘एकटी न येता जाऊबाईंना समवेत घेऊन ये’, असे सांगणे, तेव्हा ‘काहीतरी विपरीत घडले आहे’, याची जाणीव होणे : दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता ‘मी चहा घेऊन येत आहे’, असा दिरांना भ्रमणभाष केला. तेव्हा त्यांनी ‘एकटी न येता दोघी (मी आणि जाऊबाई) या’, असे मला सांगितले. हे ऐकल्यावर ‘काय झाले असावे ?’, याचा मला अंदाज आला. वाहन चालवतांना मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘रुग्णालयात पोचल्यावर मला जे काही पहायला किंवा ऐकायला मिळेल, ते सहन करण्याची मला शक्ती द्या. मला वर्तमानकाळात रहाता येऊ दे आणि येईल ती परिस्थिती स्वीकारता येऊ दे.’ रुग्णालयात पोचल्यावर माझे दीर आणि चुलत दीर श्री. बिपीन यांनी मला आधी बसायला सांगून ‘‘रवींद्र यांचे निधन झाले आहे’’, असे सांगितले. क्षणभर मला ‘काय झाले आहे ?’, हे उमगलेच नाही.
९ आ. कै. रवींद्र यांचे निधन झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘सर्व परिस्थिती स्वीकारता येऊ दे आणि कुटुंबियांना सांभाळा’, अशी प्रार्थना होणे : मी श्री गुरुचरणी प्रार्थना केली, ‘ही परिस्थिती स्वीकारता येऊ दे.’ त्यानंतर मी घरी जायचे ठरवले. घरी मुले, पुतण्या, पुतणी आणि सासूबाई होत्या. घराच्या फाटकापाशी पोचताच माझ्या मनात मुले आणि सासूबाई यांचा विचार आला. माझ्याकडून पुन्हा नकळत गुरुदेवांना प्रार्थना झाली, ‘गुरुदेवा, तुम्हीच सर्वांना सांभाळा आणि सर्वांना सांभाळण्याची शक्ती मला द्या.’ मी दुचाकी उभी करत असतांनाच मुलांनी प्रश्नांचा भडिमार चालू केला. त्यांना सांगतांनाही माझी आतून सतत प्रार्थना चालू होती, ‘या साऱ्यांना सांभाळण्याचे महत्कार्य केवळ तुम्हीच करू शकता, गुरुदेवा ! मला बळ द्या आणि सर्वांना तुम्हीच सांभाळा.’
९ इ. अंत्यविधीची सिद्धता होईपर्यंत यजमानांच्या मृतदेहाशेजारी बसून मनात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत रहाणे, मुले शांत झाल्यावर त्यांनाही नामजपाची आठवण करून देणे : रुग्णवाहिका यजमानांचा मृतदेह घेऊन घरी पोचली. त्या वेळी ‘कै. रवींद्र शांतपणे झोपी गेले आहेत’, असे वाटले. त्यांचा तोंडवळा प्रसन्न आणि तेजस्वी होता. ते पाहून गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता वाटत होती. मी मनातल्या मनात श्रीगुरूंना आळवत होते. अंत्यविधीची सिद्धता होईपर्यंत मी यजमानांच्या मृतदेहाशेजारी वातावरण शुद्धीसाठी सनातननिर्मित उदबत्ती लावून बसून होते; पण मनातल्या मनात सतत ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू होता. दोन्ही मुले थोडी शांत झाल्यावर मी त्यांनाही ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्याची आठवण करून दिली.
अंतिम संस्काराचे विधी करतांना ‘माझा मुलगा (त्या वेळी तो १० वर्षांचा होता.) श्रीनिवास (आताची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय १२ वर्षे) याला जमेल का ?’ असे मला वाटले; मात्र ‘श्री गुरूंची कृपा अपरंपार आहे’, याची मला पुन्हा प्रचीती आली आणि त्याने सर्वकाही योग्य पद्धतीने केले.’ (क्रमशः)
– श्रीमती धनश्री रवींद्र देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१०.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |