सोलापूर, ५ मे (वार्ता.) – येथील विजापूर रस्त्यावरील छत्रपती संभाजी तलावामध्ये पुन्हा जलपर्णी वाढलेली आहे. नियमित जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, तसेच भुयारी गटारीचे पाणी तलावामध्ये येऊ नये, यासाठी प्रलंबित काम पुढील ४ मासांमध्ये पूर्ण करणार, असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. ते २ मे या दिवशी महापालिका आयुक्त कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. वर्ष २०२१ मध्ये महापालिकेने तलावाचे सुशोभिकरणाचे काम हाती घेतले होते. त्या वेळी आंध्रप्रदेशातील एका आस्थापनाला कंत्राट देऊन जलपर्णी आणि तलावातील गाळ काढण्यात आला होता; मात्र पुन्हा या समस्येने तोंड वर काढण्यास प्रारंभ केला आहे.
‘भुयारी गटारीचे पाणी तलावात येत असल्याने तलाव स्वच्छ ठेवणार्या जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येते. तलावात घाण पाणी येऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे’, असे काही तज्ञांचे मत आहे. जलपर्णीच्या समस्येसमवेतच तलावाच्या सर्व बाजूंना जाळी लावण्यात आलेली नसल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणार्या नागरिकांना धोका असल्याचेही या वेळी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.