परदेशामध्ये आयुर्वेदाच्या प्रसारासाठी बोलावण्यात आल्यामुळे दोन्ही वैद्यांचे सर्वत्र कौतुक !
श्रीरामपूर (जिल्हा नगर) – नेपाळ शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या ‘नॅशनल आयुर्वेद रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर’ने १८ ते २० एप्रिल २०२२ या कालावधीत कीर्तीपूर, काठमांडू, नेपाळ येथे ‘क्लिनिकल ॲप्लिकेशन ऑफ बस्ती थेरपी (आयुर्वेदातील बस्ती उपचारपद्धतीचा रुग्णांशी संबंधित वापर)’ या विषयावर नेपाळच्या शासकीय वैद्यकीय अधिकार्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत नगर जिल्ह्यातील वैद्य सतीश भट्टड आणि वैद्य रामदास आव्हाड यांना मार्गदर्शक म्हणून आमंत्रित केले होते. दोन्ही वैद्यांचा या कार्यशाळेत शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. परदेशामध्ये आयुर्वेदाच्या प्रसारासाठी बोलावण्यात आल्यामुळे दोन्ही वैद्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वैद्य सतीश भट्टड यांचे श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथे ‘श्रीजी आयुर्वेद रुग्णालय’ आहे. वैद्य रामदास आव्हाड यांचे कोपरगाव (जिल्हा नगर) येथे ‘धन्वन्तरि आयुर्वेद रुग्णालय’ असून ते ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’ आहेत. दोघेही वैद्य ‘डिव्हाईन आयुर्वेद’ या ख्यातनाम आयुर्वेद औषधनिर्मिती आस्थापनाचे संचालक आहेत. श्रीरामपूर येथील ‘आय.एम्.ए.’ आणि ‘एस्.टी.एम्.ए.’ या संघटनांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.