(म्हणे) ‘गोल टोपी घालून ‘ईद मुबारक’ म्हणतांनाचा व्हिडिओ बनवून पाठवा !’

  • प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील शाळेचा विद्यार्थ्यांना फतवा

  • संतप्त हिंदु पालकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – ईदच्या निमित्ताने न्यायनगर पब्लिक स्कूल, झूंसी या शाळेने विद्यार्थ्यांना कुर्ता, पायजमा आणि गोल टोपी परिधान करून ‘ईद मुबारक’ म्हणत असल्याचा व्हिडिओ बनवून तो शाळेच्या गटात प्रसारित करण्याचा फतवा काढला.  यासह विद्यार्थिनींना सलवार, कुर्ता, दुपट्टा घालून तशीच कृती करण्याचे निर्देश देण्यात आले. ‘या उपक्रमात सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत काही गुण दिले जातील’, असे शाळेच्या सूचनापत्रात म्हटले आहे. यावरही काही पालकांनी आक्षेप घेतला.

१. या प्रकरणी संदीप पाठक यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, जिल्हाधिकारी आणि पोलीस यांच्याकडे तक्रार प्रविष्ट केली. त्याची तात्काळ नोंद घेत प्रयागराज पोलिसांनी झूंसी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याची सूचना केली.

२. शाळेचे मुख्याध्यापक बुशरा मुस्तफा यांनी सांगितले की, दसरा, दीपावली, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन यांसह सर्व सणांच्या दिवशी शाळेत अतिरिक्त उपक्रम आयोजित केले जातात. याच क्रमाने यावर्षी ईदच्या निमित्त मुलांना ‘ईद मुबारक’ म्हणतांनाचा व्हिडिओ बनवण्यास सांगण्यात आला. (दसरा, दीपावली या दिवशी ‘शुभ दसरा’ किंवा ‘शुभ दिपावली’ म्हणत अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना व्हिडिओ बनवून पाठवण्यास यापूर्वी का सांगण्यात आले नाही ? याचे उत्तर मुख्याध्यापकांनी दिले पाहिजे ! – संपादक) जे पालक सहमत नाही, ते त्यांच्या मुलांना शाळेतून काढू शकतात. (हिंदु पालकांनी स्वतःच्या पाल्याला अशा उद्दाम धर्मांधांच्या शाळेत का म्हणून ठेवायचे ?, असे कुणाला वाटल्यास त्यात चुकीचे काय ? – संपादक)

संपादकीय भूमिका

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली असा फतवा काढणार्‍या शाळेने कधी हिंदूंच्या सणांच्या वेळी हिंदु पद्धतीने पेहराव करून शुभेच्छा देण्याची सूचना केली आहे का ?