‘व्हॉट्सॲप’वरून चीन आणि पाकिस्तान यांच्या गुप्तहेरांनी भारतीय सैन्य अधिकाऱ्यांशी संबंध प्रस्थापित करून भारताची काही गुप्त माहिती चोरली असावी’, अशी शंका भारतीय गुप्तहेर संघटनेला आहे. हे प्रकरण काय आहे आणि ते किती गंभीर आहे, याविषयी लेखाद्वारे जाणून घेऊया.
१. भारताने संरक्षणात्मक धोरण बंद करून आक्रमक धोरण अवलंबणे
भारतीय सैन्याचे विशेष ‘कम्युनिकेशन नेटवर्क’ (संपर्क यंत्रणा) आहे. ते ‘स्टॅन्ड अलोन’ (एकमेव) असल्याने त्यामध्ये दुसऱ्या कुणालाही प्रवेश मिळत नाही. संगणकीय पत्रे आणि माहिती पाठवण्यासाठी सैन्याची स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यातही प्रवेश करणे अतिशय कठीण असते. पूर्वी चीनची माहिती काढतांना आपला मनुष्य पकडला गेला, तर ‘चीन आपल्यावर पुष्कळ रागवेल’, असे भारताच्या नेतृत्वाला वाटायचे. त्यामुळे ते चीनची माहिती काढण्यास घाबरायचे. २ वर्षांपूर्वी चीनने भारतात ४ ठिकाणी अतिक्रमण केले होते. तेव्हापासून भारताने संरक्षणात्मक धोरण बंद करून आक्रमक धोरण अवलंबले.
२. चीनला ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी भारताचे प्रयत्न
चीनचे सैन्य आपल्यासारखे फेसबूक किंवा इतर गोष्टी वापरत नाही. त्यांच्या सामाजिक माध्यमाचे नाव ‘वैबो’(Weibo) आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये घुसखोरी कशी करायची ? हे भारतासमोरील मोठे आव्हान आहे. चीनचे सामाजिक माध्यम आपल्याला कुठेच आढळून येत नाही. त्याचे ‘सर्व्हर’ आणि सर्व गोष्टी या चीनमध्ये असतात. त्यात घुसखोरी करता येईल; पण त्यासाठी मोठ्या कौशल्याची आवश्यकता आहे. कदाचित् ते भारत वेळोवेळी करत असेलही. त्याहून मोठे आव्हान हे चिनी भाषा समजण्याचे आहे. चिनी भाषा समजायला कठीण असते. त्यामुळे १०० हून अधिक सैन्याधिकाऱ्यांना चिनी भाषा शिकण्याचे काम दिले आहे. ते चीनची माहिती काढण्यास साहाय्य करतील. अशाच प्रकारे भारत अनेक महाविद्यालयांमध्ये ‘विदेशातील संबंध’ या विषयावर संशोधन कार्यक्रम चालू करत आहे. मिलिटरी इंटलिजन्स, सिव्हिल इंटलिजन्स आणि शैक्षणिक संशोधन या सर्वांच्या साहाय्याने भारतही या ‘सायबर वॉर फेअर’मध्ये (संगणकीय जालाद्वारे चालणारे युद्ध) किंवा सामाजिक माध्यमांच्या युद्धामध्ये चीनला ‘जशास तसे’ उत्तर देण्याची क्षमता निर्माण करत आहे. मला निश्चिती आहे की, येत्या दिवसांमध्ये ही क्षमता वाढेल. चीनच्या प्रत्येक कुरघोडीला भारतही त्याच्याच सामाजिक माध्यमाद्वारे प्रत्युत्तर देऊ शकतो.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे