साहित्य संमेलन कि विधीमंडळ अधिवेशन ?

संपादकीय

९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  लातूर येथील उदगीर या ठिकाणी चालू आहे. संमेलनाच्या उद्घाटनाच्या भाषणात उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ‘साहित्यिकांनी शासनकर्त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ नये’, असे वक्तव्य केले; मात्र त्यांनी ज्या व्यासपिठावरून हे वक्तव्य केले, त्या व्यासपिठावर त्यांच्याच पक्षाची नेतेमंडळी अधिक होती. संमेलनाच्या व्यासपिठावरील राजकीय मंडळींची उपस्थिती पाहून ‘हे साहित्य संमेलन आहे कि विधीमंडळ अधिवेशन आहे ?’ असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात नक्कीच उपस्थित होतो. शरद पवार यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान मोठे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण त्यांच्या वलयांकित आहे; मात्र मराठी साहित्य संमेलनही पवार यांनी कायमच स्वत:च्या वलयांकित ठेवले, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे ‘साहित्यिकांनी राजकीय ओंजळीतून पाणी पिऊ नये’, असे सांगण्यापेक्षा शरद पवार यांनी स्वत:च्या कृतीतून हे दाखवून दिले असते, तर उदगीरच्या साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावर राजकीय नेत्यांपेक्षा साहित्यिकांची गर्दी दिसली असती, हे निश्चितपणे सांगता येईल.

गेल्या काही वर्षांची साहित्य संमेलने पाहिली, तर बहुतांश संमेलनाचे उद्घाटक स्वत: शरद पवार हेच होते. वर्ष २०१३ मध्ये चिपळूण (रत्नागिरी), वर्ष २०१४ सासवड (पुणे), वर्ष २०१५ घुमान (पंजाब), वर्ष २०१६ पिंपरी (पुणे) आणि वर्ष २०१७ मध्ये डोंबिवली (ठाणे) अशी सलग ५ वर्षे शरद पवार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून व्यासपिठावर होते. वर्ष २०२१ च्या नाशिक येथील संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून, तर सध्या चालू असलेल्या उदगीर येथील संमेलनात उद्घाटक म्हणूनही तेच होते. महाराष्ट्रातील या नेत्याने साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान इतकी वर्षे स्वत:कडे ठेवण्यापेक्षा तो अन्यांना दिला असता, तर त्यांचा खरा मोठेपणा दिसला असता; परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही.

राजकारण्यांची गर्दी कशासाठी ?

संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी व्यासपिठावर पवार यांच्यासह राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री शिवराज पाटील, सांस्कृतिकमंत्री आणि लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे, अमर राजूरकर, बाबासाहेब पाटील, माजी आमदार सुधाकर भालेराव, बसवराज पाटील, लातूरचे महापौर आदी मंडळींची उपस्थिती होती. यावरून सध्याच्या साहित्य संमेलनाची स्थिती काय आहे ? याचे चित्र दिसून येईल. राजकारणी हेही साहित्यिक किंवा साहित्यप्रेमी असू शकतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्या मातृभाषेचे असल्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधीला त्याविषयी आत्मीयता वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे ‘केवळ राजकारणी आहे म्हणून त्यांना व्यासपिठावर स्थान देऊ नये’, अशी संकुचित मानसिकता येथे नाही. स्थानिक पालकमंत्री, महापौर, लोकप्रतिनिधी आदींचा संमेलन यशस्वी करण्यात मोठा सहभाग असतो. त्यामुळे त्यांना मानसन्मान देण्यात काहीही चुकीचे नाही; मात्र हे करत असतांना ‘हे राजकीय सभेचे नव्हे, तर साहित्याचे व्यासपीठ आहे’, याचे भान ठेवायलाच हवे.

केवळ व्यासपिठावर स्थान दिल्यानेच लोकप्रतिनिधींचा सन्मान होतो, असे आहे का ? राजकारण्यांच्या सभा वर्षभर चालूच असतात; मात्र मराठी साहित्य संमेलन वर्षातून एकदाच होते. या व्यासपिठावर प्रख्यात आणि नवोदित अशा साहित्यिकांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहित करण्याचे औदार्य खरेतर राजकारण्यांनी दाखवायला हवे; मात्र साहित्यिकांचे व्यासपीठ बळकावणे, हे काही योग्य नाही.

साहित्यिक शासनकर्त्यांच्या ओंजळीने पाणी का पितात ?

वर्ष २०२१ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या ९४ व्या साहित्य संमेलनाचे आयोजक असलेल्या ‘लोकहितवादी मंडळा’ने संमेलनाचा सर्व आर्थिक भार अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यावर टाकला. कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती कोलमडली असल्याने संमेलनासाठी संमत असलेले ५० लाख रुपये देणे शक्य नसतांनाही छगन भुजबळ यांनी राजकीय बळ लावून सरकारकडून तेवढा निधी मिळवला. स्थानिक लोकप्रतिनिधींचा निधी मिळून ही रक्कम १ कोटी ३० लाख रुपयांपर्यंत पोचली. राज्य आर्थिक अडचणीत असतांना अशा प्रकारे निधी गोळा करून नाशिक येथे पंचतारांकित साहित्य संमेलन पार पडले. राजकारण्यांकडून अशा प्रकारे निधी गोळा करून त्यांचा मिंधेपणा करण्यापेक्षा साहित्य मंडळाने स्वत:च्या बळावर साहित्य संमेलन करून दाखवावे; पण असे होत नाही. त्यामुळेच साहित्यिकांवर राजकारण्यांच्या ओंजळीने पाणी पिण्याची वेळ येते. ज्या राजकारण्यांना मराठीविषयी प्रेम आहे, ते संमेलनासाठी निश्चितच पैसे देतील. मराठी साहित्य संमेलनासाठी निष्काम भावनेने निधी देणारे अनेक लोकप्रतिनिधी मिळू शकतील; मात्र तो स्वाभिमान अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळामध्ये असणे आवश्यक आहे.

उदगीर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांचा संगीताचा कार्यक्रम, सध्या महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला ‘चला हवा येऊ द्या’ विनोदी कार्यक्रम, तर २४ एप्रिल या दिवशी गीतकार अवधूत गुप्ते यांचा ‘संगीत रजनी’ असे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. लाखो रुपये व्यय करून असे कार्यक्रम मराठीच्या संवर्धनासाठी नसून लोकांची गर्दी करण्यासाठी आहेत, हे कुणीही सांगू शकेल. साहित्य महामंडळाचे आणि संमेलनाचे आयोजक यांना खरोखरच साहित्याचा उत्कर्ष साधायचा असेल, तर गर्दी जमवण्यात रस दाखवण्याऐवजी त्यांनी मराठीचा उत्कर्ष करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. असे केल्यास त्यांना राजकारण्यांच्या ओंजळीने पाणी पिण्याची वेळ येणार नाही !