(म्हणे) ‘भारतात हिंदूंकडून मुसलमानांवर आक्रमणे !’ – पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालय

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतातील हिंसाचारांच्या घटनांवरून आरोप

इस्लामाबाद (पाकिस्तान) – राजधानी देहलीसमवेत भारतातील काही शहरांमध्ये हिंदूंकडून मुसलमानांवर आक्रमणे करण्यात येत आहेत. त्यामुळे मानवाधिकाराच्या उल्लंघनासाठी जगाने भारताला दोषी ठरवावे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत गुढीपाडवा, श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती यांच्या मिरवणुकांवर झालेल्या आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर पाकने हे विधान केले आहे.

पाकने म्हटले आहे की, देहलीच्या जहांगीरपुरीमधील घटनेमध्ये मशिदीवर भगवा झेंडा फडकावण्याचा प्रयत्न केला गेला आणि आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या. (ही अफवा होती आणि हे धादांत खोटे वृत्त होते, असे देहलीच्या आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. तरीही पाक या अफवेचे भांडवल करत आहे ! – संपादक) मुसलमान इफ्तार पार्टीसाठी जात असतांना हिंदूंनी त्यांना शस्त्रे दाखवली. या घटना भारतातील सरकारांची मुसलमानांच्या विरोधातील भूमिका कशी आहे, हे दाखवतात.

या घटनांमुळे भारत वेगाने हिंदु राष्ट्राच्या दिशेने जात आहे. मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यांत मुसलमानांची घरे पाडण्यात आली. या राज्यांतील घटना भारत सरकार आणि समाज यांत हिंदुत्वाची विचारधारा किती रुजली आहे, हे दाखवते. दुसरीकडे भारतात कथित दंगेखोर म्हणून मुसलमानांच्या विरोधात कारवाई केली जात आहे.

संपादकीय भूमिका

  • याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! भारतात गेल्या काही दिवसांत धार्मिक हिंसाचार झाला, तो मुसलमानबहुल भागात धर्मांधांकडून हिंदूंच्या विरोधात झाला आहे आणि हेच सत्य आहे; मात्र पाकिस्तान कांगावा करत हिंदूंनाच दोषी ठरवत आहे, यातून पाक डावपेचात किती हुशार आहे, हे लक्षात येते !
  • अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील मानवाधिकारांविषयी विधान केले होते. त्या वेळी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी त्याला सडेतोड उत्तर दिले होते. पाकच्या या आरोपांवर भारत सरकारने तात्काळ सडेतोड उत्तर देऊन त्याला गप्प केले पाहिजे !
  • पाकमध्ये हिंदु आणि ख्रिस्ती मुलींचे अपहरण करून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करून मुसलमान तरुणाशी विवाह लावला जातो, अल्पसंख्यांकांचा वंशसंहार केला जातो, याविषयी पाक का बोलत नाही ?