शिरसोली (जिल्हा जळगाव) येथे झालेल्या वादामुळे दोन गटांत दगडफेक !

  • आक्षेपार्ह ‘व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस’ ठेवल्याचे प्रकरण

  • दोन वाहनांच्या काचा फुटल्या

  • एक तरुण घायाळ

वारंवार होणार्‍या दगडफेकीच्या घटना म्हणजे कायदा-सुव्यवस्थेची एैशीतैशीच !

जळगाव – तालुक्यातील शिरसोली येथे आक्षेपार्ह ‘व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस’वरून झालेल्या वादामुळे दोन गटांत दगडफेक करण्यात आली. ही घटना १६ एप्रिलच्या रात्री १०.३० ते ११ या कालावधीत घडली. यात दोन वाहनांच्या काचा फुटल्या असून एक तरुण घायाळ झाला आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी कह्यात घेतले. गुन्हा नोंदवून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

एका तरुणाने आक्षेपार्ह ‘स्टेटस’ ठेवल्याने काही तरुणांनी त्याला मारहाण केली. मध्यस्थी करून हा वाद मिटवण्यात आला; पण त्यानंतर पुन्हा अफवा पसरवण्यात आली आणि काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली. शिरसोली गावात हनुमान जयंतीनिमित्त पोलीस बंदोबस्त असल्याने पोलीस लगेचच घटनास्थळी आले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. नेमका काय आक्षेपार्ह ‘स्टेटस’ ठेवण्यात आला होता, त्याविषयी मात्र माहिती मिळालेली नाही.