जेम्स लेनप्रकरणी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’ला पाठवलेले पत्र प्रसारित करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी !
मुंबई – जेम्स लेनप्रकरणी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाची माहिती नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. याविषयी स्वत: बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’ला लिहिलेले पत्र शरद पवार यांनी पहावे. त्यानंतर त्यांना जर ‘स्वत:ची चूक झाली आहे’, असे वाटले, तर त्यांनी महाराष्ट्राची क्षमा मागावी’, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.
१२ एप्रिल या दिवशी ठाणे येथील सभेत राज ठाकरे यांनी म्हटले होते की, बाबासाहेब पुरंदरे ब्राह्मण असल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली. जेम्स लेनप्रकरणी बाबासाहेब पुरंदरे यांना नाहक गोवण्यात आले असून या जातीयवादाच्या मागे शरद पवार आहेत. यावर पवार यांनी १३ एप्रिल या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘एका लेखकाने गलिच्छ प्रकारचे लिखाण केले आणि त्याला माहिती देण्याचे काम पुरंदरे यांनी केले. त्याविषयी पुरंदरे यांनी कधीही स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे जर त्यांच्यावर टीका-टिपणी केली असेल, तर मला त्याचे दु:ख वाटत नाही, उलट अभिमान वाटतो’, असे म्हटले. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर संदीप देशपांडे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांनी वर्ष २००३ मध्ये ‘ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी’ला लिहिलेले पत्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले आहे. या पत्रावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांसह अन्यही इतिहासकार आणि इतिहास संशोधक यांची स्वाक्षरी आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’ला पाठवलेले पत्र
पत्रात काय लिहिले आहे ?
‘ज्यांच्यावर (छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर) कोट्यवधी भारतियांचे प्रेम आहे, त्यांच्याविरोधातील निराधार आरोप आम्ही सहन करणार नाही. जेम्स लेन यांनी त्यांच्या पुस्तकात हेच केले आहे. हे पुस्तक तुमच्याकडून (‘ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी’कडून) प्रकाशित होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेव यांविषयी जेम्स लेन याने जी विधाने केली आहेत, ती त्याच्या घाणेरड्या मनोवृत्तीची उत्पत्ती आहे. त्यामुळे प्रकाशक आणि लेखक यांनी २५ नोव्हेंबर २००३ पर्यंत कोट्यवधी भारतियांच्या भावना दुखावल्याविषयी क्षमा मागावी. हे पुस्तक भारत, तसेच परदेशातूनही मागे घ्यावे. प्रकाशक आणि लेखक यांनी तसे केले नाही, तर भारत सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी, तसेच जेम्स लेन यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती आम्ही करू’, असे या पत्रात बाबासाहेब पुरंदरे, तसेच अन्य इतिहासकार यांनी लिहिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जातीयवादाचा दुसरा ढळढळीत पुरावा असू शकत नाही ! – संदीप देशपांडे, सरचिटणीस, मनसे
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत जेम्स लेनप्रकरणी बाबासाहेब पुरंदरे यांनी कुठेही काही म्हटले नसल्याचे नमूद केले; मात्र हे पत्र स्वयंस्पष्ट आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या भावना या पत्रातून व्यक्त केल्या आहेत. या पत्राची कल्पना राष्ट्रवादी काँग्रेसला १०० टक्के आहे. तरीही भांडणे लावण्याचा प्रयत्न केला गेला. राज ठाकरे त्यांच्या भाषणात ‘राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून जातीजातींत भांडणे लावण्याचे काम करण्यात आले’, असे जे म्हणाले, त्याचा ढळढळीत पुरावा या पत्रापेक्षा दुसरा कुठला असू शकत नाही. |