३ मेपर्यंत देशभरात मशिदींवरील भोंगे उतरवले गेलेच पाहिजेत !

ठाणे येथील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चेतावणी !

न्यायालयाच्या आदेशानंतरही भोंगे उतरवण्यासाठी इतक्या वर्षांत कार्यवाही होत नसतांना त्यासाठी आग्रही भूमिका घेणारे श्री. राज ठाकरे यांचे अभिनंदन !

ठाणे येथील सभेत बोलतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे

ठाणे – ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवलेच गेले पाहिजेत. ३ तारखेपर्यंत भोंगे उतरवले गेले नाहीत, तर अख्ख्या देशभर हनुमान चालिसा लागली पाहिजे, अशी चेतावणी १२ एप्रिल या दिवशी ठाणे येथील सभेत बोलतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. या देशात समान नागरी कायदा आणा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा आणा, अशा दोन मागण्या मी पंतप्रधान मोदी यांना करतो, असेही ते या वेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, यापूर्वीही केलेल्या अनेक भाषणांत भोंगे बंद होण्याविषयी मी बोललो होतो. या भोंग्यांचा अख्ख्या देशाला त्रास होतो. यात धर्माचा काय संबंध ? तुम्हाला जी अजान द्यायची, ती घरात द्या. प्रार्थना तुमची आहे, आम्हाला का ऐकवता ? हे नीट सांगून समजत नसेल, तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणारच ! आम्ही वातावरण बिघडवत नाही. वयस्कर, विद्यार्थी, महिला सर्वांना याचा त्रास होतो. एकतर सर्व बेसुर असते. आम्ही का म्हणून ऐकायचे ? कानाला त्रास होत असेल, तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत. यापासून आम्ही मागे हटणार नाही. तुम्हाला काय करायचे असेल, ते करा. याचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. ज्या देशात तुम्हाला बंदी आहे, तिथे निमूटपणे त्यांचे ऐकता ना ? ३६५ दिवस आम्ही ते का ऐकायचे ? यापुढे हे महाराष्ट्रात चालणार नाही. राज्य सरकारने स्वतः हे भोंगे उतरवावेत. आम्हाला तेढ निर्माण करायची नाही.

माझी हिंदुत्वाची भूमिका आजची नाही. पाकिस्तानी कलाकारांना हाकलण्याची भूमिका मनसेने घेतली होती. रझा अकादमीच्या मोर्च्यात पोलीस भगिनींना मारले, पत्रकारांच्या गाड्या फोडल्या, तेव्हा केवळ मनसेने मोर्चा काढला आणि पोलीस आयुक्त अरूप पटनाईक यांना पद सोडावे लागले.

जातीपातीच्या राजकारणातून बाहेर या, अशी माझी महाराष्ट्रातील बंधू-भगिनींना विनंती आहे. जातीतून बाहेर पडत नाही, तर मराठी कधी होणार आणि मराठी होत नाही, तर हिंदु कधी होणार ?, असे ते या वेळी म्हणाले.

अफझलखानाचा ‘हिरवा झेंडा विरुद्ध भगवा झेंडा’ हाच इतिहास !

ते या वेळी म्हणाले की, इतिहास पालटून सांगितला जातो. अफझलखान काय महाराष्ट्रात ‘टूर’ करायला आला होता का ? त्यांचा हिरवा झेंडा विरुद्ध भगवा झेंडा हाच इतिहास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दुसर्‍या जातीविषयी द्वेष निर्माण करायला लावला. १९९९ नंतर संभाजी ब्रिगेडसारख्या संघटना काढल्या. पवार साहेब कधीही छत्रपतींचे नाव घेत नाहीत. शरद पवार स्वतः नास्तिक असल्याने ते त्या दृष्टीने धर्माकडे पहातात.