
मुंबई – राज्याचे मराठी भाषामंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ‘मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे काही विषयांवर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी निमंत्रण दिले होते. त्यानुसार त्यांच्याशी चर्चा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनुमती घेऊनच मी इथे चर्चेसाठी आलो आहे’, असे त्यांनी सांगितले.
उदय सामंत म्हणाले की,…
१. महाराष्ट्रात विविध बँका किंवा सार्वजनिक संस्थांत मराठीशी संबंधित विषय पुढे येत आहेत. त्याचा प्रतिबंध कसा करायचा ? याविषयीच्या काही सूचना ठाकरे यांनी दिल्या. त्याविषयी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे.
२. ज्या पद्धतीने मराठी भाषिकांवर अन्याय आणि दादागिरी केली जात आहे. त्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे, तसेच त्याला कायदेशीर वलय असायला हवे, अशी सूचना राज ठाकरे यांनी केली.
३. महाराष्ट्रात जे रहातात, त्यांना मराठी बोलता यायला हवे. इतर भाषांचा आम्ही कुणीही अवमान करत नाही; पण माझ्या भाषेचा सन्मानही राखला गेला पाहिजे, अशी राज ठाकरेंची भूमिका आहे. आमचीही तीच भूमिका आहे.
४. ज्या बँका आणि संस्थांचा दैनंदिन संबंध मराठी माणसांशी येत असतो, त्यांनी मराठी भाषेत व्यवहार केले पाहिजेत. याविषयी पुढील ९ ते १० दिवसांत पोलीस विभाग आणि जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली जाणार आहे. मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, यासाठी समिती स्थापन केलेली आहे, ज्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. त्या समितीचे सदस्य पोलीस अधीक्षक आहेत. या समित्यांची बैठक घेऊन मराठीच्या संदर्भात उलटसुलट व्यवहार करणार्यांच्या विरोधात काय कारवाई करायची, याची भूमिका त्या बैठकीत ठरवली जाईल, अशी महत्त्वाची माहिती उदय सामंत यांनी दिली.