पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
सावंतवाडी – दोडामार्ग तालुक्यातील सासोली गावात चालू असलेल्या परप्रांतियांच्या दडपशाहीच्या विरोधात स्थानिक आमदार आणि पालकमंत्री गप्प का ? दडपशाहीच्या प्रवृत्तीला त्यांनी वेळीच लगाम घालून सर्वसामान्य शेतकर्यांना न्याय द्यावा, अन्यथा भविष्यात या परप्रांतियांच्या विरोधात स्थानिक भूमीपुत्रांच्या संरक्षणासाठी मनसे रस्त्यावर उतरेल, अशी चेतावणी मनसेचे जिल्हाध्यक्ष अधिवक्ता अनिल केसरकर यांनी दिली आहे.
याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केसरकर यांनी म्हटले आहे की,
१. सासोली गावातील डोंगरातील भूमी देहली येथील ‘धी-ओरिजीन’ या आस्थापनाने गृह प्रकल्पासाठी खरेदी केलेल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयाच्या वारंवार फेर्या मारायला लावणार्या महसूल यंत्रणेने या आस्थापनासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून पायघड्या पसरल्याचे चित्र दिसत आहे.
२. भूमी खरेदी करतांना आणि त्यानंतर त्याचा अकृषक वापर करण्यासाठी जी अनुमती देण्यात आली, ती संशयास्पद आहे. ज्या भूमी खरेदी करण्यात आलेल्या आहेत, त्या सर्व सामायिक आणि डोंगर भागातील आहेत. अनेक ठिकाणी वन विभागाची भूमी आहे.
३. असे असतांना आणि स्थानिक शेतकरी उपोषण, भूमी मोजणीस मोठा विरोध करत असतांना याची साधी नोंददेखील या भागाचे आमदार दीपक केसरकर अथवा पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेली नाही. याउलट भूमी मोजणीच्या वेळी शेतकर्यांचा आवाज दाबण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा आस्थापनाच्या दिमतीसाठी तैनात करण्यात आला.
४. वास्तविक शेतकर्यांनी आस्थापनाच्या विरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले आहेत आणि दिवाणी न्यायालयात दावा चालू आहे. सर्वसामान्य नागरिकांना नियमावर बोट ठेवून पोलीस संरक्षण नाकारणारी पोलीस यंत्रणा या मोजणीच्या वेळी हातात लाठ्या काठ्या घेऊन आस्थापनाच्या दारात उभी होती.
५. तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या आस्थापनाला दिलेली अकृषिक सनद तात्काळ रहित करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला दिले होते; मात्र आता ‘स्थानिक शेतकर्यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. आमचे सरकार पारदर्शी आहे’, अशा वल्गना करणारे पालकमंत्री नितेश राणे याकडे दुर्लक्ष करत आहेत.