डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक पू. किरण फाटक (वय ६६ वर्षे) यांनी संगीत साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

संगीत क्षेत्रात योग्य मार्गदर्शक गुरु मिळणे आवश्यक !

‘पू. किरण फाटक हे डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक आहेत. त्यांचे वडील श्री. भास्करराव फाटक हे घरी संगीताच्या शिकवण्या घेत होते. त्यामुळे पू. किरण फाटक संगीताच्या वातावरणातच लहानाचे मोठे झाले. पुढे त्यांनी बांद्रा (मुंबई) येथील स्व. इंदिराबाई केळकर आणि त्यानंतर पुणे येथील श्री. विकास कशाळकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले.

पू. किरण फाटक हे ‘संगीत अलंकार’ असून गेल्या ३० वर्षांपासून डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथे ‘भारतीय संगीत विद्यालया’च्या माध्यमातून मुलांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण देत आहेत. गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी, तसेच अन्य संगीत कार्यक्रमांना त्यांना परीक्षक म्हणून बोलावले जाते. ते श्री स्वामी समर्थ यांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांना स्वामी समर्थांवर विविध काव्ये आणि भक्तीपर कवने स्फुरली आहेत. आतापर्यंत त्यांचे ४ काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी ‘संगीत’ या विषयावर विविध ग्रंथांचे लिखाणही केले आहे. ६.१.२०२० या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. किरण फाटक यांनी संतपद (७१ टक्के आध्यात्मिक पातळी) गाठल्याचे घोषित केले.

‘संगीत क्षेत्रातील नवोदित विद्यार्थ्यांनी संगीताकडे साधना (उपासना) म्हणून कशा प्रकारे पहावे ?’, याविषयीचे मौलिक मार्गदर्शन पू. किरण फाटक यांनी काही लेखांमधून केले आहे. त्यांच्या या लेखांमधून संगीताकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टीकोन संगीत क्षेत्रातील कलाकारांना मिळू शकेल.’

– सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.३.२०२२) 

पू. किरण फाटक

 १. ध्येय गाठण्यासाठी योग्य मार्गदर्शकाची आवश्यकता असणे

‘कुठलेही ज्ञान घ्यायचे असल्यास कुणाच्या तरी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. नव्या शहरात फिरत असतांना आपण आपले इप्सित स्थान अथवा घर सापडेपर्यंत बऱ्याच जणांना विचारतो. ‘आपल्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी कोणत्या रस्त्याने कसे जायचे ?’, हे सांगणारा कुणीतरी भेटावा लागतो. जर योग्य व्यक्ती भेटली नाही, तर आपण रस्ता चुकतो आणि फसतो. यात ‘योग्य’ या शब्दाला फार महत्त्व असते.

२. गुरुमुखी कला म्हणजे काय ?

अध्यात्मात मार्गदर्शन करणारे सद्गुरु असतात, प्रपंचात गुरु असतात आणि संगीतात शिक्षक असतात. संगीतात तपस्वी शिक्षकाला ‘गुरु’ म्हणतात. संगीत ही गुरुमुखी कला आहे. गुरुमुखी कला म्हणजे काय ? ‘स्वरांची स्थाने, स्वरांच्या रचना आणि स्वरसमूह’ गळ्यातून काढण्याची पद्धत गुरुमुखातूनच शिष्याला कळू शकते.

३. संगीतक्षेत्रातील योग्य गुरूंचे महत्त्व

संगीतक्षेत्रात गुरु फार महत्त्वाचे असतात; पण ते योग्य गुरु विद्यार्थ्याच्या भाग्यात असावे लागतात. ‘गुरुप्राप्ती’ हा आयुष्यातील मोठा शुभयोग असतो. पुष्कळ शोधल्यावरसुद्धा काही जणांना योग्य गुरुप्राप्ती होत नाही. ज्ञान मिळवता येत नाही. कधी कधी आयुष्यातील एका वळणावर अकस्मात् गुरु भेटतात.

४. गुरु-शिष्य यांचे नाते

सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर

गुरु आणि शिष्य यांची स्पंदने (Wavelength) जुळावी लागतात, म्हणजेच मनोमीलन व्हावे लागते, तरच पुढचा शैक्षणिक प्रवास निर्वेध (निश्चिंत) आणि सुखकर होतो. गुरु-शिष्याची ताटातूट झाली, तर शिष्य तळमळतो. याचे उदाहरण, म्हणजे पंडित जगन्नाथबुवा पुरोहित (गुनिदास) आणि त्यांचे गुरु आग्रा घराण्याचे उस्ताद विलायत हुसेन खाँ साहेब (प्राणपिया). त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. या दोघांची ताटातूट झाली. तेव्हा गुनिदासांनी या विषयावर अनेक बंदिशी (टीप) रचल्या. ‘पीर पराई, जाने नहीं बालमवा…’ ही बंदीश या ताटातुटीमधल्या विरहावर बेतली आहे. असे गुरु-शिष्याचे प्रेम हवे.

टीप – शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. यालाच ‘छोटा ख्याल’, ‘बंदीश’ किंवा ‘चीज’, असेही म्हणतात. ही मध्यलय किंवा द्रुतलय यांत गातात.

५. संगीत क्षेत्रातील तपस्वी गुरूंची लक्षणे

अ. आरंभी ‘स्वरांची निश्चित स्थाने कोणती ?’, हे शिष्याला ठाऊक नसते. ‘ती तू प्रथम जाणून घे आणि नंतरच मी तुला पुढे शिकवीन’, असे जे गुरु शिष्याला ठामपणे सांगतात, ते शिष्याला योग्य मार्गावर नेऊन ठेवतात.

आ. गुरु शिष्याच्या मर्यादा जाणणारे हवे. ‘कोणत्या शिष्याला किती ज्ञान, किती दिवसात आणि किती प्रमाणात युक्तीयुक्तीने कसे द्यावे ?’, हे ठाऊक असणारे गुरु असायला हवेत. ‘ज्ञान देणे’, हेही मोठे कौशल्याचे काम आहे. बैठका (मैफिली) गाजवणारा कितीही मोठा कलाकार असला, तरी तो उत्तम गुरु होऊ शकेलच, असे नाही.

इ. गुरूंकडे संयम, शिष्याप्रती निःस्वार्थी प्रेम आणि शिकवण्याची चिकाटी असली पाहिजे.

ई. ‘शिकवणे’, हे त्यांचे ध्येय असायला हवे. ‘शिकवणे हीसुद्धा एक साधना आहे’, असे त्यांना वाटायला हवे; कारण देत गेल्याने  ज्ञान नेहमी वाढतच जाते.

उ. शिष्यांच्या चुकांवर डोळसपणे विचार केल्यास गुरूंना नवा प्रकाश दिसू शकतो. एका वेगळ्या दृष्टीकोनातून विचार केला, तर शिष्य अनाहूतपणे गुरूंच्या विचारांना नवी दिशा देऊ शकतात; पण यासाठी गुरु आणि शिष्य यांचे एक वेगळेच घट्ट मानसिक नाते (bonding) असावे लागते.

ऊ. शिष्याला शिकतांना अनेक प्रश्न पडतात; किंबहुना ते पडायला हवेत. हे प्रश्न त्याने न संकोचता त्याच्या गुरूंना विचारायला हवेत आणि गुरूंनीसुद्धा न रागावता, न चिडता त्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. खरेतर संवादातून किंवा प्रश्नोत्तरांतून ज्ञान प्रगट होते. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातून श्रीमद्भगवद्गीता निर्माण झाली. समर्थ रामदासस्वामी आणि त्यांचा शिष्य कल्याणस्वामी यांच्या संवादातून श्री दासबोधाचा जन्म झाला.

ए. शिष्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर गुरूंना ठाऊक नसेल, तर शिष्याला तसे सांगून काही दिवसांच्या कालावधीत त्याचे उत्तर गुरूंनी शोधले पाहिजे आणि शिष्याचे शंकासमाधान केले पाहिजे.

ऐ. गुरूंनी स्वतः प्रथम विद्यार्थी असणे आवश्यक आहे. जेथून ज्ञान मिळेल, तेथून ते गोळा करून त्यावर मनन आणि चिंतन करून गुरूंनी ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचवले पाहिजे.

ओ. गुरु गप्पिष्ट, छंदिष्ट (लहरी / मनस्वी), कोपिष्ट आणि ज्ञान घेण्याच्या संदर्भात अल्पसंतुष्ट असता कामा नये. ते केवळ संगीतातच नव्हे, तर एक आदर्श माणूस म्हणूनही असले पाहिजे. गुरूंनी सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर रहाणे हितकारक ठरते; अन्यथा त्या व्यसनांचा ठसा शिष्यांवर पडल्याविना रहात नाही.

औ. गुरूंनी सर्व स्त्री-शिष्यांना आदराने वागवणे आवश्यक असते. गुरूंची स्त्री शिष्यांप्रतीची वागणूक स्वच्छ आणि निरागस हवी.

अं. थोडक्यात गुरु विनम्र, निर्व्यसनी, ज्ञानाचे भुकेले, शांत स्वभावाचे, अल्प बोलणारे, संगीताविषयी ज्ञानाने पूर्ण भरलेले, निगर्वी, शुद्ध आचरण ठेवणारे आणि शिष्याला दीपस्तंभासारखे वाटतील, असे असावेत. ‘शिष्याला गुरूंविषयी अभिमान वाटेल’, असे गुरु हवेत.’

– (पू.) किरण फाटक, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (५.६.२०२१)