श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास’
सांगली, २५ मार्च (वार्ता.) – श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाच्या स्मरणार्थ बलीदान मासाच्या अखेरीस प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक चितेला अग्नी देण्यात येतो. या चितेसाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढुबुद्रुक येथील समाधीपासून धारकरी धावत ही ज्वाला घेऊन येतात. ही ज्वाला २० मार्च या दिवशी सांगलीत दाखल झाली. या ज्वालेच्या स्वागतासाठी सांगलीवाडीपासून भव्य दुचाकीफेरी काढण्यात आली. शहरातील विविध मार्गांवरून जाऊन ही फेरी श्री शिवतीर्थ येथे समाप्त झाली. त्याच दिवशी सांगली जवळील अनेक गावांतून धारकर्यांनी त्यांच्या गावी ही ज्वाला नेली. ‘ही ज्वाला मारुति मंदिर येथे ठेवण्यात आली असून ज्यांना हवी त्यांनी ती घेऊन जावी’, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले आहे.
या प्रसंगी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फेरीच्या अग्रभागी ज्वाला, भगवा ध्वज, तसेच छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा असलेली चारचाकी गाडी होती. भगवे फेटे, भगवे ध्वज, तसेच ‘भारत माता की जय’, ‘हर हर महादेव’, ‘जय भवानी जय शिवाजी’, च्या गजरात अवघी सांगली वीरसरात न्हाऊन निघाली.