मालवण येथे कनिष्ठ अभियंत्यास धक्काबुक्की केल्याचे प्रकरण
मालवण – येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन कनिष्ठ अभियंत्यास अपशब्द वापरून धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या प्रकरणी तालुक्यातील तारकर्ली गावच्या सरपंच सौ. स्नेहा जितेंद्र केरकर यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी कनिष्ठ अभियंता नितीन दाणे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. (जनता लोकप्रतिनिधींचा आदर्श घेत असते. त्यामुळे लोकप्रतिनिधींचे अशाप्रकारचे वर्तन जनतेला कोणता आदर्श देणार ? हा प्रश्नच आहे ! – संपादक)
सरपंच सौ. केरकर त्यांच्या मागण्यांसाठी २१ मार्चपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणास बसल्या होत्या. २२ मार्चला दुपारी प्रकृती बिघडल्याची तक्रार त्यांनी संबंधित कार्यालय प्रमुखांकडे केली होती. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्यांना याविषयीची माहिती देऊन तपासणीसाठी बोलावण्यात आले होते; मात्र सायंकाळपर्यंत वैद्यकीय अधिकारी उपोषण स्थळी न आल्याने सौ. केरकर यांना राग आला. रागाच्या भरात त्यांनी कार्यालयात जाऊन डॉक्टर न आल्याविषयी विचारणा केली. त्या वेळी ‘शासकीय वैद्यकीय अधिकार्यांना माहिती दिली आहे’, असे सांगितल्यावर सौ. केरकर यांनी अपशब्द वापरून धक्काबुक्की केली, तसेच माझ्या शर्टच्या ‘कॉलर’ला पकडले, तसेच पटलावरील (टेबलावरील) कागद आणि भ्रमणभाष भिरकावून दिला’, अशी तक्रार दाणे यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली.