लहान वयात अत्यंत प्रगल्भ विचार असलेली फोंडा (गोवा) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. श्रिया राजंदेकर (वय १० वर्षे) !

‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’

कु. श्रिया राजंदेकर

‘डिसेंबर २०२१ च्या पहिल्या आठवड्यात आम्ही गोव्याहून सांगली येथे जात होतो. या प्रवासात एका गावातून जातांना आम्हाला मार्गाच्या कडेने शाळेत चाललेली लहान मुले दिसली. कुणाच्या हातात फाटकी पिशवी होती, तर कुणाचा गणवेश खराब, अस्वच्छ किंवा फाटलेला होता; कुणाच्या पायात अगदी साधी चप्पल होती, तर बर्‍याच मुलांच्या पायात चप्पलही नव्हती. त्या वेळी श्री. अनिरुद्ध (माझे पती, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचे श्रियाशी (माझ्या मुलीशी) पुढील संभाषण झाले. (भाग २)

दैवी बालकांच्या पालकांचे कर्तव्य !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘काही पालक ‘नातेवाईक काय म्हणतील ?’, या विचाराने त्यांच्या मुलांना साधना करण्यास विरोध करतात; परंतु ते लक्षात घेत नाहीत की, हे नातेवाईक केवळ याच जन्मातील आहेत. पालकांनी ‘जन्मोजन्मींचे नाते असणार्‍या देवाला काय अपेक्षित आहे?’, याचा प्रथम विचार केला पाहिजे आणि मुलांना साधना करण्यास सर्वतोपरी साहाय्य केले पाहिजे. ती त्यांची साधनाही होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले (१६.११.२०२१)

श्री. अनिरुद्ध राजंदेकर आणि सौ. मानसी राजंदेकर

श्री. अनिरुद्ध : श्रिया, आपल्यावर गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) किती कृपा आहे ना ! देवाने आपल्याला जीवनात असे कष्ट दिले नाहीत.

कु. श्रिया : हो बाबा, खरेच आहे. परम पूज्यांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) कृपा आहे; म्हणूनच असे आहे.

श्री. अनिरुद्ध : श्रिया, तुला या मुलांकडे बघून काय वाटते ?

कु. श्रिया : बाबा, मला या मुलांकडे बघून काहीच वाटत नाही; कारण ते त्यांचे प्रारब्ध भोगून संपवत आहेत. आपल्याला वाईट वाटून काहीच उपयोग होणार नाही. आपण आपला नामजप आणि साधना यांकडेच लक्ष दिले पाहिजे. ते आपले दायित्व आहे. ती मुले त्यांचे भोग भोगत आहेत.

श्री. अनिरुद्ध : या मुलांना साधना कोण सांगणार ? ती मुले साधनेत पुढे कशी जाणार ?

कु. श्रिया : योग्य वेळ आली की, देवच त्यांना कुणाच्या तरी माध्यमातून साधना सांगेल. ‘प्रत्येकाने आपल्या कर्माचे फळ आणि प्रारब्ध भोगून कधी पुढे जायचे ?’, हे देवाने ठरवलेले असते. आपण त्यात काहीच करू शकत नाही. आपण त्याकडे साक्षीभावाने बघायचे.

श्रियाचे हे उत्तर ऐकून आम्ही निरुत्तर झालो. वयाच्या दहाव्या वर्षी तिच्या विचारांची प्रगल्भता बघून आम्हाला काही क्षणांसाठी फार आश्चर्य वाटले. सर्वसामान्यपणे कुणाच्याही मनात या गरीब लहान मुलांकडे बघून सहानुभूतीचे विचार येतील; परंतु श्रियाच्या संदर्भात तसे झाले नाही.

त्याच वेळी आमच्याकडून प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी कृतज्ञताही व्यक्त झाली; कारण श्रियाचे हे विचार, म्हणजे केवळ प.पू. गुरुदेवांची शिकवण आणि त्यांचे साधनेचे संस्कार आहेत. ‘त्यांनी श्रियामध्ये साधनेचे बीज किती खोलवर रुजवले आहे आणि तेच तिला कसे घडवत आहेत !’, याची या प्रसंगातून आम्हाला जाणीव झाली. इतके परिपूर्ण आणि सुस्पष्ट आध्यात्मिक दृष्टीकोन केवळ प.पू. गुरुदेवच शिकवू शकतात अन् त्याच समवेत ते मांडण्यासाठी आवश्यक गुणही तेच निर्माण करू शकतात.

आम्हाला या प्रसंगात एकच वाटले, ‘धन्य धन्य ते प.पू. गुरुदेव आणि धन्य त्यांची शिकवण !’ आम्ही श्री गुरुचरणी अखंड कृतज्ञ आहोत !’

– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (आई, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), फोंडा, गोवा. (३०.१२.२०२१)

 

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) यांना जाणवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची महानता !

पू. वामन राजंदेकर

एकदा पू. वामन (सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर) यांनी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले नारायण आहेत. नारायण ‘तत्त्व’ आहे. ते तेजतत्त्व आहे. मी त्यांच्याशी बोलू शकत नाही.’’ (साधकांना वाटते, ‘इतर मुलांप्रमाणे पू. वामन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे जात नाही किंवा त्यांच्याशी बोलत नाही. पू. वामन यांच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांविषयी असलेल्या आदरामुळे ते त्यांच्याशी इतर मुलांप्रमाणे बोलत नाहीत.’)

– कु. श्रिया राजंदेकर (पू. वामन यांची बहीण, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय १० वर्षे), फोंडा, गोवा. (५.१२.२०२१)