चीनच्या जिलिन प्रांतात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने निर्बंध लागू

अमेरिकेतही रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा निर्बंधांची शक्यता !

नवी देहली – चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली आहे. कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये १९ मार्च या दिवशी २ सहस्र १५७ नवीन कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली, ज्यामध्ये बहुसंख्य जिलिन प्रांतात आढळले आहेत. जिलिन प्रांतात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहेत आणि लोकांना प्रवास करण्यासाठी पोलिसांची अनुमती घेणेही बंधनकारक केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँटोनी फौसी यांनी चेतावणी दिली की, अमेरिकेत रुग्णांची संख्या वाढल्यास देशात पुन्हा एकदा निर्बंध लावले जाऊ शकतात. ‘ओमायक्रॉनच्या ‘बीए.२’ या प्रकारामुळे संसर्गाचे प्रमाण वाढू शकते’, असेही त्यांनी म्हटले आहे.