‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपट करमुक्त करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, १८ मार्च (वार्ता.) – काश्मिरी हिंदूंवर झालेले अत्याचार आजपर्यंत जाणीवपूर्वक लोकांसमोर येऊ दिले नाहीत. ३ लाख काश्मिरी पंडितांना एका रात्रीत त्यांची सर्व संपत्ती, घर सोडून काश्मीर सोडून पळून जावे लागले होते. त्याचप्रकारे नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि इतर अन्य मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी कशाप्रकारे प्राण पणाला लावून पावनखिंडीत लढा दिले याचे यथार्थ चित्रण ‘पावनखिंड’ या चित्रपटात करण्यात आले आहे. तरी ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘पावनखिंड’ हे चित्रपट करमुक्त करावेत, या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना कोल्हापूर यांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी स्वीकारले.

जिल्हाधिकार्‍यांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विस्थापित काश्मिरी हिंदु बांधवांना महाराष्ट्रात आश्रय दिला होता. काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आरक्षण घोषित करण्यात आले होते. या चित्रपटात काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराचे सत्य चित्रीकरण दाखवण्यात आले असल्याने हा चित्रपट करमुक्त होणे अत्यावश्यक आहे.

या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, हिंदू एकताचे श्री. चंद्रकांत बराले, पंचायत समिती सदस्य श्री. कृष्णात पवार, विश्व हिंदु परिषदेचे श्री. विजयराव पाटील, विश्व हिंदु परिषद जिल्हामंत्री अधिवक्ता सुधीर वंदुरकर-जोशी, सनातन संस्थेचे आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे आणि श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.