कीव/मॉस्को – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी इस्रायलचे पंतप्रधान नफ्टाली बेनेट, तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोआन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा करून त्यांना युद्ध थांबवायला सांगण्याची विनंती केली होती. त्यानंतर या तिन्ही राष्ट्राप्रमुखांनी पुतिन यांच्याशी चर्चा केल्यानंतरही पुतिन यांनी युद्ध थांबवण्यास नकार दिला. यामागे २ कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे.
१. पहिले म्हणजे पुतिन यांचा अमेरिका आणि युरोप यांच्यावर विश्वास नाही. ‘अमेरिकेला युरोपच्या बहाण्याने रशियाला घेरायचे आहे’, असे पुतिन यांना वाटते. युक्रेनला अमेरिकेचे वर्चस्व असलेल्या ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’मध्ये (‘नाटो’मध्ये) सहभागी व्हायचे आहे. यामुळे रशियाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.
२. युक्रेनने युरोपीयन युनियनच्या सदस्यत्वाची मागणी केली आहे. ‘नाटो’ आणि युरोपीयन युनियन यांच्या करारानुसार, जर त्यांच्या कोणत्याही सदस्य देशावर गोळीबार झाला, तर सर्व देश एकत्रितपणे लढतील. त्यामुळे युक्रेन ‘नाटो’चा सदस्य होताच रशियाला सर्व बाजूंनी ‘नाटो’ देश घेरतील. यामुळे अमेरिकेला रशियावर थेट आक्रमण करण्याचे स्वातंत्र्य मिळेल.
३. दुसरे कारण म्हणजे रशियाला जो दर्जा सोव्हिएत युनियनमध्ये होता, तोच दर्जा पुतिन यांना हवा आहे. अलीकडे रशियाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. दुसर्या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियन एक मोठी शक्ती म्हणून उदयास येत होती. रशियाला युरोपीय देशांवर वर्चस्व मिळवायचे होते. त्यामुळे रशियाचे युरोपीय देशांशी संबंध बिघडले. अमेरिकेला रशियाच्या या परिस्थिचीचा लाभ घ्यायचा आहे; म्हणून ‘युक्रेनने ‘नाटो’ आणि युरोपीयन युनियन यांचे सदस्य व्हावे’, अशी अमेरिकेची इच्छा आहे. यातून अमेरिका सर्वांत मोठी शक्ती म्हणून उदयास येऊ शकते.
३ राष्ट्रप्रमुखांच्या चर्चेत काय झाले ?
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पुतिन यांच्याशी चर्चा केली. या वेळी त्यांनी ‘युक्रेनच्या अणू प्रकल्पाला लक्ष्य करू नका’, असे आवाहन केले. यावर पुतिन यांनी मॅक्रॉन यांना सांगितले की, युक्रेनच्या अणू प्रकल्पावर आक्रमण करण्याचा माझा हेतू नाही.
युक्रेनने अटी मान्य केल्या तर युद्ध संपेल ! – पुतिन
तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोआन यांनी व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली. त्यात पुतिन यांनी एर्दोआन यांना स्पष्टपणे सांगितले की, युक्रेनने आमच्या अटी मान्य केल्या, तर युद्ध त्वरित संपेल.
इस्रायल मध्यस्थी करण्यास सिद्ध !
इस्रायलचे पंतप्रधान नफ्टाली बेनेट यांची पुतिन यांच्याशी चर्चा करून या युद्धामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव ठेवला.