युक्रेनमधील रशियन ऑर्थोडॉक्स चर्चकडून रशियाच्या सैन्याला साहाय्य !

लंडन/मॉस्को – युक्रेनविरुद्ध युद्ध लढण्यासह रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे ‘मदर रशिया’ धोरण लाभदायक ठरत असल्याचे दिसत आहे. या धोरणाद्वारे युक्रेनच्या अनेक शहरात रशियन ऑर्थोडॉक्स चर्चला स्वतःच्या बाजूने करण्यास पुतिन यशस्वी झाले आहेत. युक्रेनच्या लवीव, सुमी, कोलोमया, वोयलनस या शहरांत रशियन ऑर्थोडॉक्स चर्च श्रद्धाळूंसाठी बंद करण्यात आले. आता या शेकडे वर्षे जुन्या चर्चमध्ये शिधा आणि शस्त्रे जमवली जात आहेत.

युक्रेनी संरक्षण संस्थांनी नुकतीच युक्रेनच्या अनेक चर्चमध्ये पडताळणी केली. यात दिसले की, चर्चशी संबंधित लोक रशियाच्या सैनिकांना शहरांविषयी अनेक गोपनीय माहिती देत आहेत. पश्‍चिम युक्रेनच्या पोचियेव शहरातील सर्वांत जुन्या चर्चमध्ये चौकशीत आढळले की, हे चर्च भाविकांसाठी बंद आहे; परंतु येथे सुमारे ५०० लोकांसाठी शिधा जमवली गेली आहे.

रशिया ईश्‍वराला काय उत्तर देणार ? – झेलेंस्की

युक्रेनी राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी म्हटले आहे, ‘अंतिम निर्णयाच्या दिवशी रशिया ईश्‍वराला काय उत्तर देणार ? ईश्‍वर रशियाला कधीच क्षमा करणार नाही.’