हिंदूंना धर्मशिक्षित करण्यासाठी मंदिरांनी धर्मशिक्षणाचे केंद्र बनले पाहिजे ! – धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश, बिहार, पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत येथील मंदिरांचे विश्वस्त अन् पुरोहित संघटना यांच्या ‘ऑनलाईन’ मासिक बैठकीचे आयोजन

वाराणसी (उत्तरप्रदेश) – साधना आणि धर्मशिक्षण यांच्या अभावी आजचा हिंदु समाज जागृत नाही. त्यामुळे महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिरांच्या माध्यमातून भगवान शिवाच्या उपासनेसंबंधी समाजात शास्त्र पोचवण्यासाठी मंदिर धर्मशिक्षणाचे केंद्र बनले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंदिरांचे विश्वस्त आणि पुरोहित संघटना यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पू. सिंगबाळ मार्गदर्शन करत होते. या बैठकीमध्ये उत्तरप्रदेश, बिहार, पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत येथील मंदिरांच्या क्षेत्रात कार्य करणारे प्रतिनिधी उपस्थित होते.

पू. नीलेश सिंगबाळ

पू. सिंगबाळ यांनी प्रारंभी भगवान शिवाचे आध्यात्मिक वैशिष्ट्य आणि शिवाच्या उपासनेचे महत्त्व विषद केले. तसेच, ‘महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिरांच्या माध्यमातून धर्मप्रसाराचे कार्य विहंगम पद्धतीने कसे करू शकतो?’, याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थितांनी ‘भगवान शिवाविषयी शास्त्रीय माहिती देणारे फ्लेक्स, पत्रक, भित्तीपत्रक इत्यादींच्या माध्यमातून अधिकाधिक जागृती करू’, असे सांगितले.