जगाने दीर्घकाळ युद्धासाठी सिद्ध रहावे ! – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

संयुक्त राष्ट्रांच्या २८ सदस्य देशांचे सैन्य युक्रेनच्या साहाय्याला जाणार !

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध कितीही काळ चालेल, असे मॅक्रॉन यांनी सांगितले

पॅरिस (फ्रान्स) – रशिया-युक्रेन युद्ध दीर्घकाळ चालणार असून जगाने त्यासाठी सिद्ध रहायला हवे, असे प्रतिपादन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणात केले. मॅक्रॉन पुढे म्हणाले, ‘‘या युद्धामुळे आणि त्याअनुषंगाने उद्भवणार्‍या पेचप्रसंगांचेे दूरगामी परिणाम होतील. या युद्धात फ्रान्स युक्रेनला सर्वतोपरी साहाय्य करणार असून रशियाच्या कृतीला खंबीरपणे आणि संघटितपणे विरोध करील. सध्या घडत असलेल्या घडामोडी युरोप आणि फ्रान्स यांच्या इतिहासातील निर्णायक टप्पा आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युरोपमधील स्थैर्य आणि शांतता यांवरच घाला घातला आहे. फ्रान्स आणि त्याचे सहकारी देश यांनी हे संकट टाळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले; पण ते व्यर्थ ठरले.’’

संयुक्त राष्ट्रांच्या २८ सदस्य राष्ट्रांनी युक्रेनला युद्धविषयक साहाय्य करण्यास सहमती दिली आहे. अमेरिकेनेही रशियाच्या विरोधात युक्रेनला शस्त्रास्त्रांची आणि सैन्याचे साहाय्य करण्यास प्रारंभ केला आहे.