नवी देहली – डॉनेत्स्क आणि लुहान्स्क हे दोन्ही प्रांत युक्रेनच्या पूर्व सीमा भागात रशियाला खेटून आहेत. युक्रेनच्या या २ प्रांतांमध्ये रशियाच्या आश्रयाखालील समर्थक सक्रीय आहेत. येथील इतिहास पहाता अप्रत्यक्षपणे या देशांवर रशियाचे नियंत्रण राहील, असे सांगितले जात आहे.
१. वर्ष २०१४ मधील क्रिमियावरील आक्रमणापासूनच येथील रशियाच्या बंडखोरांनी युक्रेनच्या सैन्याशी चकमकी चालू केल्या. या बंडखोरांना रशियाच्या सरकारने धोकादायक शस्त्रे पुरवली. आतापर्यंत झालेल्या संघर्षाच्या कारवायांमध्ये १४ सहस्रांहून अधिक बळी गेले आहेत.
२. डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या प्रांतांत ‘रशियन’ भाषा बोलणार्यांची संख्या ‘युक्रेनियन’ भाषा बोलणार्यांपेक्षा अधिक आहे.
३. रशियाने राष्ट्र म्हणून या प्रांतांना मान्यता दिली असली, तरी त्याने सैन्य माघारी बोलावलेले नाही. उलट एक लाखाऐवजी त्याच्या जवळपास दुप्पट सैनिक युक्रेन सीमेवर जमल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.
४. रशियाचा घनिष्ठ मित्र असलेल्या बेलारूसमध्ये सध्या रशियाच्या काही तुकड्या युद्धसरावासाठी दाखल झाल्या आहेत. या तुकड्या सरावाची मुदत संपून गेल्यानंतरही बेलारूसमध्येच ठाण मांडून आहेत. बेलारूस युक्रेनच्या उत्तरेकडे असल्यामुळे रशियाकडून तेथून आणखी एक आघाडी उघडली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
५. त्यामुळे युक्रेनची दोन्ही बाजूने कोंडी करून हे दोन प्रांत ‘राष्ट्र’ म्हणून घोषित करण्याचा पुतिन यांचा डाव यशस्वी ठरल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत आहे.
६. आता काही तज्ञांच्या मते पुतिन यांची दृष्टी या दोन प्रांतांना क्रिमियाशी जोडणार्या भूभागावर असणार आहे.