पाकचे सैन्यदल प्रमुख आणि भ्रष्टाचारी नेते यांची स्विस बँकेत अब्जावधी रुपयांची संपत्ती असल्याचे उघड !

पाकच्या २०० खातेधारकांकडे १ सहस्र ९०० कोटी रुपये काळा पैसा !

पाकच्या राजकारण्यांना हा पैसा अन्य इस्लामी राष्ट्रांकडून अथवा चीनकडून भारतविरोधी कारवायांसाठी मिळाला आहे का ?, या दृष्टीने अन्वेषण करण्याची मागणी भारताने केली पाहिजे ! – संपादक

‘आयएस्आय’चे माजी प्रमुख जनरल अख्तर अब्दुर्रहमान (डावीकडे)

नवी देहली – जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित बँकांपैकी एक असलेल्या ‘क्रेडिट सुइस’मधील खातेधारकांविषयीची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्विस बँकांपैकी एक असलेल्या या बँकेमध्ये पाकिस्तानातील १ सहस्र ४०० लोकांची एकूण ६०० खाती आहेत. ‘दी न्यूज’ने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार या खात्यांमध्ये अशा खात्यांचाही उल्लेख आहे, जी आधी अनेक वर्षे चालू होती; परंतु आता बंद झाली आहेत. यामध्ये असे अनेक पाकिस्तानी राजकारणी, सैन्यदल प्रमुख आणि अधिकारी यांचा समावेश आहे, जे त्या काळात विविध सामाजिक दायित्वे सांभाळत होते. यामध्ये पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आयएस्आय’चे माजी प्रमुख जनरल अख्तर अब्दुर्रहमान यांचेही नाव आहे. अब्दुर्रहमान हे वर्ष १९७९ ते १९८७ या काळात ‘आयएस्आय’चे प्रमुख होते.

पाकच्या निवडणूक आयोगाकडेही स्वत:ची संपत्ती घोषित करतांना संबंधित राजकारण्यांनी कधीच स्विस बँकेतील त्यांच्या खात्यांचा उल्लेख केला नाही. या अहवालातून समोर आले आहे की, पाकच्या साधारण २०० खातेधारकांच्या खात्यांमध्ये असलेली रक्कम ही तब्बल १०० मिलियन स्विस फ्रैंक (१ सहस्र ९०० कोटी रुपये) आहे.