(म्हणे) ‘भारतासमवेत पुन्हा व्यापार चालू करणे काळाची आवश्यकता !’ – पाकला उपरती

कलम ३७० रहित केल्यामुळे पाकने भारतासमवेतचा व्यापार केला होता बंद !

गेली ३ दशके पाकिस्तान भारतात आतंकवादी कारवाया करत असतांना भारताने पाकसमवेतचा व्यापार बंद केला नाही; मात्र पाकने तात्काळ बंद केला. आता पाक तो पुन्हा चालू करण्याचे म्हणत असला, तरी भारताने तो चालू करू नये. पाकला आतंकवाद थांबवण्यासाठी भाग पाडावे, असेच भारतियांना वाटते !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतासमवेत व्यावसायिक नाते ही काळाची आवश्यकता आहे. यात दोन्ही देशांचा लाभ आहे, असे विधान पाकने केले आहे. काश्मीरला स्वतंत्र अस्तित्व प्रदान करणारे कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर पाकने भारतासमवेतचे सर्व व्यापारी संबंध संपुष्टात आणले होते. ‘काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू होत नाही, तोपर्यंत भारताशी व्यापर करणार नाही’, असे पाकने घोषित केले होते. ‘सध्या पाक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याने त्याला आता भारताशी व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याची जाणीव होऊ लागली आहे’, असे म्हटले जात आहे.

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सल्लागार अब्दुल रजाक दाऊद यांनी म्हटले, ‘भारताशी व्यापार करणे कुणालाही लाभदायकच आहे. विशेषकरून पाकला लाभदायक आहे. त्यामुळे तो त्वरित चालू झाला पाहिजे. मी याच्या समर्थनात आहे.’