भगवान श्रीकृष्णाची कूटनीती !

पू. तनुजा ठाकूर

श्रीकृष्णाने जरासंधाला १७ वेळा पराभूत करूनही त्याला जिवंत का सोडले ?

‘श्रीकृष्णाशी होणार्‍या युद्धातील प्रत्येक पराभवानंतर जरासंध समविचारी राजांना संपर्क करत असे आणि महासंघटन करून मथुरेवर आक्रमण करत असे. (जरासंध हा महाभारतकालीन मगध देशाचा राजा आणि कंसाचा सासरा होता. श्रीकृष्णाने कंसाचा वध केल्यामुळे क्रोधित झालेल्या जरासंधाने श्रीकृष्णाचे वास्तव्य असलेल्या मथुरेवर १७ वेळा आक्रमण केले होते.) प्रत्येक वेळी श्रीकृष्ण संपूर्ण सेनेला नष्ट करत असे आणि एकट्या जरासंधाला सोडून देत असे. हे सर्व पाहून बलराम अत्यंत क्रोधित झाले. ते श्रीकृष्णाला म्हणाले, ‘‘हे केशव, जरासंध आपल्याकडून पुनःपुन्हा पराभूत होतो आणि नंतर पुन्हा पृथ्वीच्या कानाकोपर्‍यांतून दुष्टांचे महासंघटन करून आपल्यावर आक्रमण करतो. तू त्याची संपूर्ण सेना नष्ट करतोस; परंतु दुराचार आणि दुष्टपणा यांचे मूळ असलेल्या जरासंधाला तू का सोडून देतोस ?’’

तेव्हा श्रीकृष्णाने हसत बलरामाला समजावले, ‘‘हे बंधू, मी जरासंधाला पुनःपुन्हा जाणूनबुजून यासाठी सोडून देतो; कारण तो संपूर्ण पृथ्वीवरील दुष्टांना एकत्र करून त्यांना माझ्याकडे घेऊन येतो. त्यामुळे मी एकाच स्थानी राहून सहजतेने पृथ्वीवरील या सर्व दुष्टांना नष्ट करू शकतो, अन्यथा या दुष्टांना मारण्यासाठी मला फिरावे लागले असते आणि खोटे रूप धारण करून या दुष्टांचा शोध घ्यावा लागला असता. त्यासाठी मला अत्यंत खडतर परिश्रम करून त्रासही झेलावे लागले असते; पण दुष्टांचे निर्दालन करण्याचे माझे कार्य जरासंधाने सोपे केले आहे. जेव्हा मी सर्व दुष्टांना मृत्यूलोकी धाडीन, तेव्हा सर्वांत शेवटी जरासंधाला ठार करीन. त्यामुळे हे बंधू बलराम, तुम्ही मुळीच चिंता करू नका. जरासंधाला ठार करण्याची तुमची ही इच्छा मी अवश्य पूर्ण करणार आहे.’’

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (२१.११.२०२१)