‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’च्या आक्रमणात १०० पाकिस्तानी सैनिक ठार

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या बलुचिस्तान प्रांतातील पंजगूर आणि नुष्की येथील पाक सैन्याच्या तळावर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने केलेल्या आक्रमणामध्ये १०० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे; मात्र पाकने ‘हे आक्रमण उधळून लावण्यात आले’, असा दावा केला आहे. यात ४ बलुचींना ठार करण्यात आल्याचेही सैन्याने म्हटले आहे. यापूर्वीच ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’च्या आक्रमणात १० पाक सैनिक ठार झाले होते. त्याला पाकचे सैन्यदलप्रमुख जनरल बाजवा यांनी ३० घंट्यानंतर दुजोरा दिला होता.

१. ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने दावा केला आहे की, या आक्रमणाचे वृत्त प्रसारित न करण्यास पाकच्या प्रसारमाध्यमांना पाक सैन्याकडून सांगण्यात आले आहे. आक्रमण झाल्याच्या ठिकाणचे भ्रमणभाष, दूरभाष आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

२. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आक्रमण उधळून लावल्यावरून पाक सैन्याचे कौतुक केले आहे. ‘संपूर्ण देश पाकिस्तान सैन्याच्या पाठीशी उभा आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.