एस्.टी. कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्याविषयी नक्षलवाद्यांनी सालेकसा (गोंदिया) पोलीस ठाण्याजवळ झळकावली भित्तीपत्रके आणि फलक !

नक्षलवाद्यांनी एस्.टी. कर्मचार्‍यांचे केले समर्थन !

कित्येक दशकांपासून चालू असलेला माओवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयश !

प्रवक्ता अनंत यांनी या पत्रकात म्हटले आहे की, २१ ऑक्टोबरपासून एस्.टी. कर्मचार्‍यांचे आंदोलन चालू आहे; परंतु मुख्यमंत्री ठाकरे या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. परिवहनमंत्री हा संप सोडवण्यासाठी एकीकडे बैठका घेतात, तर दुसरीकडे संप चिरडून टाकण्यासाठी प्रयत्न करतात. कर्मचार्‍यांना बडतर्फ केले जात आहे. एस्.टी. कर्मचार्‍यांचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे.

गोंदिया – सध्या राज्यात चालू असलेल्या एस्.टी. महामंडळाच्या आंदोलनाविषयी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्ह्यातील सालेकसा येथे नक्षलवाद्यांनी चक्क सालेकसा पोलीस ठाण्याच्या १ किलोमीटर अंतरावर भित्तीपत्रके आणि फलक झळकावले आहेत. (नक्षलवादी असे कृत्य करत असतांना त्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना का मिळत नाही ? पोलीस ठाण्याच्या आवारातील नक्षलवाद्यांचा ठावठिकाणा शोधू न शकणारे पोलीस गल्लीबोळातील आतंकवाद्यांचा शोध घेऊ शकतील का ? – संपादक) २५ जानेवारी या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आली.

कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड स्पेशल झोनल कमिटीच्या वतीने हे पत्रक काढण्यात आले आहे. अनंत नावाच्या झोनलच्या प्रवक्त्याची त्यावर स्वाक्षरी आहे.