(म्हणे) ‘पाकिस्तान पुढील १०० वर्षे भारताशी शत्रुत्व ठेवणार नाही !’

  • आर्थिक डबघाईला गेलेल्या पाकच्या राष्ट्रीय धोरणात पालट

  • महत्त्वपूर्ण राष्ट्रीय धोरणामध्ये काश्मीरचे सूत्र मात्र कायम !

  • आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्यामुळे पाक असे सांगत आहे; मात्र यावर कोण विश्‍वास ठेवणार ? ‘पाठीत सुरा खुपसणे’ ही पाकची वृत्ती आहे. त्यामुळे अशा भूलथापांना भारत भूलणार नाही, हेच खरे ! – संपादक
  • ‘पडतो, तरी नाक वर’ या म्हणीनुसार खाण्या-पिण्याचे वांदे झाले, तरी  भारताचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मीरवर पाक त्याचा अधिकार सांगत आहे ! हे लक्षात घेऊन आता भारतानेही पाकव्याप्त काश्मीरवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता ‘आर-पार’चे प्रयत्न करावेत, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे ! – संपादक

इस्लामाबाद – भारताशी संबंधांमध्ये कटुता आल्याने पाकला शेकडो कोटी रुपयांची हानी सोसावी लागत आहे. एकूणच पाकचे आर्थिक स्तरावर धिंडवडे निघाले आहेत. अशातच पाकने बनवलेल्या त्याच्या पहिल्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचा काही भाग जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये शेजारी देशांसमवेत चांगले व्यावसायिक संबंध बनवण्यास प्राधान्य दिले जाईल, असे म्हटले आहे. या धोरणामध्ये भारताशी पुढील १०० वर्षे शत्रुत्व न ठेवण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. १०० पृष्ठांच्या या धोरणामध्ये मात्र असेही म्हटले आहे की, काश्मीरच्या सूत्रावर अंतिम निर्णय न घेता भारताशी व्यापार अन् व्यवसाय या दृष्टीनेच संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले जातील. यासमवेतच महत्त्वपूर्ण राष्ट्रीय धोरणामध्ये काश्मीरचे सूत्र मात्र कायम ठेवले जाईल.

१. भारताने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यावर पाकने भारताशी असलेले प्रशासकीय संबंध, तसेच दोन्ही देशांतील व्यापार यांच्यावर प्रतिबंध आणले होते.

२. पाकचे पंतप्रधान इम्रान खान या नव्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाला १४ जानेवारी या दिवशी कार्यान्वित करतील.

३. पाकने या धोरणातील काहीच भाग सार्वजनिक केला असून उर्वरित भाग गोपनीय ठेवला आहे. हे धोरण बनवण्यामध्ये पाकिस्तानी सैन्याने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.

(म्हणे) ‘मोदी शासन असतांना भारताशी चांगले संबंध ठेवणे अशक्य !’ – पाकिस्तान

पाकिस्तानला ‘हिंदुत्वनिष्ठ’ असणारे मोदी नकोसे वाटणार, यात आश्‍चर्य ते काय ? – संपादक

पाकच्या ‘एक्सप्रेस ट्रिब्यून’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एका पाकिस्तानी अधिकार्‍याने म्हटले की, भारतात मोदी शासन असतांना भारताशी चांगले संबंध ठेवणे अशक्य आहे.