बांगलादेश : ३ हिंदु मंदिरांच्या दारांवर अज्ञातांनी गोमांसाच्या पिशव्या टांगल्या

  • इस्लामी देशातील अल्पसंख्यांक हिंदूंची स्थिती जाणा ! भारतात कधी बहुसंख्यांकांकडून अशा प्रकारच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या घटना घडतात का ? तरीही हिंदूंना ‘तालिबानी’ म्हणण्याचा प्रयत्न होतो आणि दुसरीकडे अफगाणिस्तानातील तालिबान्यांचे समर्थनही केले जाते !
  • शेजारील इस्लामी देशांतील अल्पसंख्यांक हिंदूंच्या हितासाठी भारतातील आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांनी काहीच न केल्याने तेथील हिंदूंना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यामध्येच या सर्व समस्यांचे निराकरण होणे शक्य आहे, हे जाणा !
प्रातिनिधिक छायाचित्र

ढाका (बांगलादेश) – शुक्रवार, ३१ डिसेंबर या दिवशी बांगलादेशातील लालमोनिरहाटच्या हातीबांधा उपजिल्ह्यातील गेंडुकुरी गावात ३ हिंदु मंदिरांच्या दारांवर आणि एका हिंदु व्यक्तीच्या घराच्या दारावर कच्च्या गोमांसाने भरलेल्या पॉलिथिनच्या पिशव्या टांगण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी हातीबांधा पोलीस ठाण्यात ४ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या घटनांचा निषेध करण्यासाठी स्थानिक हिंदूंनी गावातील श्री श्री राधा गोविंदा मंदिरात एकत्र येऊन निषेध केला. ‘या घटनेमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून दोषींना अटक होईपर्यंत आंदोलन करणार’, असे हिंदूंनी घोषित केले आहे. बांगलादेशातील ‘दी डेली स्टार’ दैनिकाने हे वृत्त प्रकाशित केले आहे.

१. ‘हातीबांधा उपजिल्हा पूजा उदजपन (उत्सव) परिषदे’चे अध्यक्ष दिलीप कुमार सिंह म्हणाले की, कच्च्या गोमांसाने भरलेल्या पॉलिथिनच्या पिशव्या गेंडुकुरी कॅम्प पारा श्री श्री राधा गोविंदा मंदिर, गेंडुकुरी कुठीपारा श्री महाकाली मंदिर, गेंडुकुरी बट्टाला श्री महाकाली मंदिर आणि श्री. मोनिंद्रनाथ बर्मन यांच्या घराच्या दारावर टांगण्यात आल्या होत्या. पोलिसांनी आम्हाला आश्‍वासन दिले आहे की, दोषींना अटक केली जाईल.

२. हातीबांधा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी इरशादुल आलम यांनी सांगितले की, आम्ही या घटनेचे अन्वेषण करत आहोत. संबंधित सर्वांवर कारवाई केली जाईल.