सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी घेतलेल्या शिबिरानंतर ज्ञानशक्ती प्रसार अभियानांतर्गत ‘मकरसंक्रांत मोहिमे’ला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

मकरसंक्रांतीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ज्ञानगंगा सर्वदूर पोचवूया !  – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

दैवी आशीर्वाद लाभलेले सनातनचे ग्रंथ

‘समष्टी सेवेची तीव्र तळमळ, धर्मप्रेमी, वाचक, जिज्ञासू आणि साधक यांना साधनेत पुढे नेण्याचा अखंड ध्यास अन् समष्टी भाव असणार्‍या सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी २८.११.२०२१ या दिवशी ‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने प्रसार कसा करायचा ?’, यासाठी  या जिल्ह्यांसाठी ऑनलाईन शिबिर घेतले. सर्व साधक ज्ञानशक्ती प्रसार अभियानाच्या अंतर्गत ग्रंथवितरण करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. ‘मकरसंक्रांत’ ही या मोहिमेसाठी सुवर्णसंधी आहे. सद्गुरु (कु.) स्वातीताईंनी सर्वांना ‘या सुवर्णसंधीचा लाभ प्रसारासाठी कसा घ्यायचा ? जिज्ञासूंना धर्मकार्यात सहभागी करून घेण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ? परात्पर गुरु डॉ. आठवले यांची (प.पू. गुरुदेवांची) ज्ञानगंगा सर्वदूर कशी पसरवायची ?’, याची दिशा दिली.

‘मागील लेखात आपण सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनानंतर मोहिमेला कसा आरंभ झाला आणि सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे झालेला विहंगम प्रसार याविषयी पाहिले. या लेखात आपण साधकांनी अनुभवलेला गुरुकृपेचा ओघ आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या एका वाचकाला आलेली अनुभूती पाहूया.  भाग २

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/539041.html

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांची वाणी या माध्यमांतून साधकांनी अनुभवलेला गुरुकृपेचा ओघ !

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची (परम पूज्य गुरुमाऊलीची) कृपा आणि सद्गुरूंची वाणी या माध्यमातून साधक गुरुकृपेचा ओघ अनुभवत आहेत. ‘मकरसंक्रांतीचा सण म्हणजे समष्टी सेवेची अनमोल पर्वणीच आहे’, असा भाव ठेवून साधक प्रयत्न करत आहेत. या मोहिमेला गुरुदेवांच्या कृपेने भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यातील काही निवडक प्रतिसाद आणि वैशिष्ट्यपूर्ण घटना पुढे देत आहोत.

अ. आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांनी मागील दोन मास शिक्षकांसाठीच्या साधना सत्संगात जोडणार्‍या त्यांच्या पत्नीच्या तीन बहिणींना संक्रांतीच्या वाणाचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी ग्रंथ घेण्यासाठी लगेच होकार दिला. प्रत्येकीने लघुग्रंथाची मागणी केली. त्यातील सौ. संध्या पाटील यांनी स्वतः ग्रंथ घेतले आणि त्यांच्या शाळेतील सहशिक्षिकांना विषय सांगून वाण देण्यासाठी सनातनचे ग्रंथ घेण्यासाठी प्रबोधन केले. त्यानंतर त्या शिक्षिकांनीही लघुग्रंथाची मागणी केली.

आ. साधकांनी एका ‘वाचक सत्संगा’तील जिज्ञासूंना संपर्क केल्यानंतर त्यांनी त्यांच्या सहा नातेवाइकांची नावे सांगितली. तेव्हा त्यांनी सहा जणांना संपर्क करून लघुग्रंथांची मागणी घेतली. धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमी सौ. स्मिता गुरव (गोवा) यांनी त्यांच्या नातेवाइकांना संपर्क करून लघुग्रंथांची मागणी घेतली.

इ. राजगुरुनगर (पुणे) येथील ‘सनातन प्रभात’च्या एका वाचकाने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने वाण देण्याचे महत्त्व जाणून घेतल्यानंतर लघुग्रंथांची मागणी दिली.

सौ. मनीषा पाठक

ई. पूर्वी कोल्हापूर येथे वास्तव्यास असणार्‍या आणि आता गोवा येथे रहाणार्‍या ‘सनातन प्रभात’च्या वाचिका सौ. स्वाती कुलकर्णी या मागील तीन मास नामजप करणे, सत्संग ऐकणे आणि जमेल तशी सेवा करणे या माध्यमातून जोडलेल्या आहेत. त्यांनी त्यांचे नातेवाईक, मैत्रिणी आणि शेजारी असलेल्या सर्व हिंदु महिलांना हे दैवी ज्ञान मिळावे, यांसाठी लघुग्रंथाची मागणी दिली.

उ. सद्गुरु (कु.) स्वातीताईंनी सोलापूर येथे चालू असलेल्या सत्संगातील जिज्ञासूंना संपर्क केल्यानंतर जिज्ञासूंनीच पाच कुटुंबांना बोलावले आणि त्यांना ‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने वाण म्हणून सनातनचे ग्रंथ भेट देऊ शकतो’, याविषयी सांगितले. तेव्हा पाच जणांनी वेगवेगळ्या ग्रंथांची मागणी दिली आणि त्यांच्या वसाहतीत सत्संगही चालू केला.

ऊ. साधिका श्रीमती लीला घोले (पुणे) या पूर्वी संगीताची शिकवणी घेत होत्या. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या शिकवणीमधील विद्यार्थिनींना संपर्क केला. त्यातील सौ. संपदा फडके आणि सौ. माधुरी कुलकर्णी यांना विषय पुष्कळ आवडला. त्यांनी लघुग्रंथांची मागणी दिली आणि ग्रंथसूचीही मागवली. त्या म्हणाल्या, ‘‘आमच्या ओळखीच्या आणि वसाहतीतील मैत्रिणींना हा विषय सांगून आणि ग्रंथ दाखवून आम्हीही मागणी घेऊ शकतो. आम्हालाही सेवा करायला आवडेल.’’ सौ. संपदा फडके यांनी त्यांच्या सुनेसाठी सूचीतील ग्रंथांची नावे पाहून मुलांचे उत्तम संगोपन व्हावे, या दृष्टीने ‘बाळाची वाढ आणि विकास (लसीकरणाच्या विवेचनासह)’ अन् ‘बोधकथा’ या ग्रंथांची मागणी केली.

ए. वारणानगर येथील वारणा दूध संघामध्ये श्री. अनिल हेरले हे ‘मार्केटिंग ऑफिसर’ (विपणन अधिकारी) आहेत. त्यांना सनातन निर्मित ग्रंथांचे महत्त्व आणि देवतांच्या संदर्भातील मूलभूत शास्त्र याविषयी माहिती सांगितल्यावर त्यांनी संक्रांतीच्या निमित्ताने वेगवेगळे लघुग्रंथ मागवले.

ऐ. सातारा येथील सौ. मंगला पत्की या ‘सनातन प्रभात’च्या वाचिकेला सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व आणि लाभ सांगितल्यानंतर त्यांनी त्वरित लघुग्रंथाची मागणी दिली. त्या म्हणाल्या ‘परात्पर गुरु डॉक्टर सेवांच्या माध्यमातून साधनेची भरभरून संधी देत आहेत.’’

ओ. सोलापूर येथील श्रीमती आशा गुंड यांनी त्यांच्या दोन मुलींना मकरसंक्रांत वाणाविषयी सांगून ग्रंथ घ्यायला सांगितले. त्यांनी त्यांच्या मुलींच्या चार उच्च अभियांत्रिकी शिक्षण झालेल्या मैत्रिणींचीही नावे आणि संपर्क क्रमांक देऊन मुलींच्या मैत्रिणींनाही सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ नामसत्संगात जोडायला सांगितले. या मैत्रिणी आता नियमित भावसत्संग ऐकतात.

औ. सोलापूर येथील ‘सनातन प्रभात’च्या वाचिका सौ. शोभा आरगड यांनी त्यांनी त्यांच्या शेजारी रहात असलेल्या एका शिक्षकांना विषय सांगून लघुग्रंथाची मागणी घेतली. ही समष्टी सेवा झाल्यानंतर ‘हे सर्व प्रयत्न गुरुदेवांनीच करवून घेतले’, असा कृतज्ञताभाव त्यांनी व्यक्त केला.

क. पाचवड येथील ‘श्री वैभव स्टील फर्निचर’चे मालक हे ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत. त्यांनी त्यांच्या आईला संक्रांतीच्या निमित्ताने वाण म्हणून ग्रंथ देण्याविषयी सांगितल्यावर त्यांच्या आईने मुलींसाठी ग्रंथ घेतले आणि ‘असे चांगले ग्रंथ समाजापर्यंत पोचले पाहिजेत’, असे मत व्यक्त केले.

 ख. साधकांनी सातारा येथील साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वाचिका सौ. उषा विनायक साळुंखे यांना संपर्क केला. तेव्हा त्यांनी लघुग्रंथ आणि उदबत्तीच्या पाकिटांची मागणी दिली. त्या वेळी त्यांनी त्यांचे पती श्री. विनायक साळुंखे यांना आलेली पुढील अनुभूती सांगितली.

८. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. विनायक साळुंखे यांना आलेली अनुभूती  

८ अ. नामजप केल्याने घरातील अनेक अडचणी सुटणे : आम्ही ‘साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू केल्यापासून मी ‘कुलदेवी’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप चालू करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे माझ्या घरातील अनेक अडचणी सुटल्या.’ – श्री. विनायक साळुंखे, सातारा

प.पू. गुरुदेवांच्या कृपेने या मोहिमेत सहभागी होऊन सर्वांना सेवा करण्याची अनमोल संधी मिळत आहे, त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (कु.) स्वातीताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे (१४.१२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक