सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी घेतलेल्या शिबिरानंतर ज्ञानशक्ती प्रसार अभियानांतर्गत ‘मकरसंक्रांत’ मोहिमेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

मकरसंक्रांतीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ज्ञानगंगा सर्वदूर पोचवूया !  – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

दैवी आशीर्वाद लाभलेले सनातनचे ग्रंथ

‘समष्टी सेवेची तीव्र तळमळ, धर्मप्रेमी, वाचक, जिज्ञासू आणि साधक यांना साधनेत पुढे नेण्याचा अखंड ध्यास अन् समष्टी भाव असणार्‍या सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी २८.११.२०२१ या दिवशी ‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने प्रसार कसा करायचा ?’, यासाठी ऑनलाईन शिबिर घेतले. सर्व साधक ज्ञानशक्ती प्रसार अभियानाच्या अंतर्गत ग्रंथवितरण करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. ‘मकरसंक्रांत’ ही या मोहिमेसाठी सुवर्णसंधी आहे. सद्गुरु (कु.) स्वातीताईंनी सर्वांना ‘या सुवर्णसंधीचा लाभ प्रसारासाठी कसा घ्यायचा ? जिज्ञासूंना धर्मकार्यात सहभागी करून घेण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ? परात्पर गुरु डॉ. आठवले यांची (प.पू. गुरुदेवांची) ज्ञानगंगा सर्वदूर कशी पसरवायची ?’, याची दिशा दिली. त्यानंतर सनातनच्या ११२ व्या समष्टी संत पू. (कु.) दीपाली मतकर आणि ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. मनीषा पाठक यांनी ‘या प्रसारसेवेचे नियोजन कसे करावे ?’, याविषयी सूत्रे सांगितली. या शिबिरात सर्व साधक ऑनलाईन सहभागी झाले होते.  भाग १

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

१. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने वाण देतांना मायेतील अन्य वस्तू देण्यापेक्षा ‘साधनेसाठी चिरकाल साहाय्य करणारे ग्रंथ’ देऊन त्यांच्या घरी साधनेचे बीज रोवूया !

‘सद्गुरु (कु.) स्वातीताई म्हणाल्या, ‘‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी सार्वजनिक हळदी-कुंकू आणि तीळगूळ वाटप समारंभ असतात. त्या वेळी महिला एकमेकींना वाण देतात. वाण देतांना मायेतील अन्य वस्तू देण्यापेक्षा ‘साधनेसाठी चिरकाल साहाय्य करणारे सनातनचे ग्रंथ’ देऊन त्यांच्या घरी साधनेचे बीज रोवण्याचा प्रयत्न करायला हवा. सनातन निर्मित ग्रंथांच्या माध्यमातून ‘साक्षात् गुरुदेवांची ज्ञानशक्तीच त्यांच्यापर्यंत पोचणार आहे’, असा भाव ठेवून आपण या समष्टी कार्यात सहभागी व्हायला हवे आणि इतरांनाही सहभागी करवून घेतले पाहिजे.’’

२. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या दैवी वाणीतून मिळालेल्या मार्गदर्शनानंतर असा झाला मोहिमेचा आरंभ !

२ अ. साधकांनी कुटुंबियांची मागणी घेतल्यानंतर उत्स्फूर्तपणे जिज्ञासूंना संपर्क करणे आणि ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने आदी वस्तूंची मागणी घेणे : सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारे सर्व साधक, त्यांचे कुटुंबीय आणि जिज्ञासू यांना संपर्क करण्याची सेवा चालू झाली. साधकांनी प्रथम स्वत:च्या कुटुंबियांना लागणारी मागणी घेतली. त्यानंतर साधकांनी उत्स्फूर्तपणे जिज्ञासूंना संपर्क केल्यावर ज्यांना वाण म्हणून देण्यासाठी ग्रंथ घेणे शक्य नाही, त्यांनी सनातननिर्मित सात्त्विक उत्पादने, तसेच नामपट्टी आदी वस्तू घेण्याचा मानस व्यक्त केला.

२ आ. जिज्ञासूंना संपर्क करण्याच्या संदर्भात साधकांनी केलेले प्रयत्न : साधकांनी त्यांचे नातेवाईक, शेजारी, विज्ञापनदाते, हितचिंतक, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ या सर्वांना अनौपचारिक संपर्क करण्यास आरंभ केला. साधकांनी त्यांना ‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने ते ग्रंथ मोहिमेत कसे सहभागी होऊ शकतात ?’, याविषयी विचारले. (सद्गुरु (कु.) स्वातीताई नेहमी ‘समष्टीमध्ये जिज्ञासूंना संपर्क कसा करावा ? विषय कसा मांडावा ?’ याविषयी प्रत्येक आठवड्याला होणार्‍या ऑनलाईन सत्संगातून आणि वेळोवेळी झालेल्या शिबिरांतून मार्गदर्शन करत असतात. या सत्संगांतून साधकांना सत्सेवेमध्ये पुढील प्रयत्नांची दिशा मिळते.)

पू. (कु.) दीपाली मतकर

३. साधकांनी ध्येय ठेवून प्रयत्न केल्याने जिज्ञासू, वाचक, धर्मप्रेमी, हितचिंतक, विज्ञापनदाते यांनी मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेणे आणि त्यामुळे अल्प कालावधीतच मोहिमेचा प्रसार होणे

प्रत्येक साधकाने ‘किती जणांना या मोहिमेत सहभागी करून घ्यायचे ?’, असे ध्येय घेतले. या ध्येयामुळे प्रत्येक साधकाला प.पू. गुरुदेवांनी दिलेल्या अनमोल संधीची जाणीव झाली आणि त्याला ‘सर्वांना या गुरुकार्यात सहभागी करून घेण्याची ही संधी आहे’, असा समष्टी भाव ठेवून प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळाली. साधकांशी जोडलेले वाचक, धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांचेही गट करून साधक त्यांचे आढावे घेत असत. त्यामुळे अल्प कालावधीतच मोठ्या प्रमाणात या मोहिमेचा प्रसार झाला आणि जिज्ञासू, वाचक, धर्मप्रेमी, हितचिंतक अन् विज्ञापनदाते यांनी मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.

३ अ. ‘धर्मशिक्षण सर्वांपर्यंत पोचावे’, यांसाठी अनेक मान्यवरांनी मोहिमेत सहभागी होण्यासाठी सिद्धता दर्शवणे : संक्रांतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी नगरसेवक, आमदार आदी मान्यवरांकडून मोठ्या प्रमाणात हळदी-कुंकू समारंभांचे आयोजन करण्यात येते. अशा मान्यवरांना संपर्क करून त्यांचे या माध्यमातून ‘धर्मशिक्षण सर्वांपर्यंत पोचावे’, यासाठी प्रबोधन केल्यानंतर अनेक मान्यवरांनी मोहिमेत सहभागी होण्यासाठी सिद्धता दर्शवली आणि प्रयत्न चालू केले.

४. सामाजिक माध्यमांद्वारे होणारा विहंगम प्रसार

‘सनातनच्या ग्रंथांच्या मुखपृष्ठावरील चित्रासह त्या ग्रंथात कोणती माहिती वाचायला मिळेल ?’, अशी माहिती देणारे संदेश सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्यात आले. संक्रांतीनिमित्त वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे ग्रंथ, उदा. पूजासाहित्याचे महत्त्व, देवघर आणि देवघरातील उपकरणे, अलंकारशास्त्र, सात्त्विक रांगोळ्या, रामरक्षास्तोत्र अन् मारुतिस्तोत्र, शिव अशा ग्रंथांच्या छायाचित्रात्मक ‘पोस्ट’ (प्रसार करण्याची माहिती) बनवून त्या प्रसारित करण्यात आल्या. यांमुळे जिज्ञासूंनी साधकांना थेट संपर्क करून ग्रंथांची मागणी दिली. काही वाचक, विज्ञापनदाते यांनीही अशा प्रकारच्या ‘पोस्ट’ त्यांच्या संपर्कातील जिज्ञासूंना पाठवून मोहिमेत सहभाग घेतला. या मोहिमेमुळे प्रत्येक साधकाला नवचैतन्य मिळून साधक मोहिमेत नियमित सहभागी होण्यासाठी प्रयत्न करू लागले.

सौ. मनीषा पाठक

५. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सत्सेवेतील सुवर्णसंधीचा मोठ्या संख्येने कृतज्ञतापूर्वक लाभ घेणारे जिज्ञासू !

या मोहिमेत जिज्ञासूंनी पुढाकार घेऊन समष्टी सेवा केली. सर्व जिल्ह्यांतील मिळून ३७५ हून अधिक धर्मप्रेमी, वाचक, विज्ञापनदाते, हितचिंतक, साधक आणि त्यांचे नातेवाईक या मोहिमेत सहभागी झाले.

६. अभियानाला मिळालेला प्रतिसाद म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ज्ञानगंगा प्रवाहित झाल्याचे द्योतक !

या मोहिमेद्वारे मिळत असलेला प्रतिसाद पाहून सहभागी साधक आणि जिज्ञासू हे परात्पर गुरुदेवांची ज्ञानगंगा प्रवाहित झाल्याचे क्षणोक्षणी अनुभवत आहेत. ‘परात्पर गुरुदेवांची कृपादृष्टी, तसेच सद्गुरु आणि संत यांचा संकल्प या दोन्हींतून मिळणार्‍या चैतन्यात न्हाऊन निघत आहोत’, असा भाव साधकांच्या मनात निर्माण झाला आहे. सहस्रो लघुग्रंथ आणि ग्रंथ यांची मागणी जिज्ञासूंनी केली आहे. मागणीतील बहुतांश ग्रंथ वितरित होऊन ते जिज्ञासूंपर्यंत पोचले आहेत. मोहिमेत ग्रंथ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने यांची मागणी वाढत आहे. संक्रांत मोहीम अजूनही चालू असल्याने मोहिमेत सहभागी सर्व जण उत्साहाने प्रयत्न करत आहेत.’

– सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे (१४.१२.२०२१)