बेळगावमध्ये पोलीस प्रशासनाची मराठी भाषिकांविरोधात दडपशाही !

बेळगावमध्ये पोलीस प्रशासनाची मराठी भाषिकांविरोधात दडपशाही : मध्यरात्री २७ जणांना अटक, तर ६१ जणांवर गुन्हे नोंद

बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे प्रकरण

बेळगाव, १९ डिसेंबर (वार्ता.) – बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर बेळगाव येथे शिवसेना, महाराष्ट्र एकीकरण समिती, तसेच मराठी भाषिक यांनी आंदोलन केले. आंदोलन केलेल्या मराठी भाषिकांविरोधात बेळगाव पोलिसांची दडपशाही चालू असून ऐन मध्यरात्री २७ जणांना अटक केली, तर ६१ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

यात काही अल्पवयीन युवकांनाही कह्यात घेतल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अटक केलेल्यांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके, माजी महापौर सरिता पाटील, रमाकांत कोंडुस्कर यांचा समावेश असून या सर्वांना जामीन न मिळण्यासाठी १४ प्रकारची कलमे लावण्यात आली आहेत.