कपुरथळा (पंजाब) येथे शिखांच्या पवित्र ध्वजाची विटंबना करणार्‍याचा मारहाणीत मृत्यू !

‘पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक आल्यामुळे जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या घटना घडवल्या जात आहेत का ?’, याचा शोध केंद्र सरकारने घेतला पाहिजे ! – संपादक 

विटंबना करणार्‍याला मारहाण करताना गावकरी

कपुरथळा (पंजाब) – कपुरथळा जिल्ह्यात असलेल्या निजामपूर गावातील गुरुद्वारामध्ये एका व्यक्तीने निशाण साहिबची (शिखांच्या पवित्र ध्वजाची) विटंबना केली. गावकर्‍यांनी विटंबना करणार्‍याला पकडून बेदम मारहाण केली. ‘मारहाणीनंतर हा तरुण कुठे गेला ?’, याविषयी कुणालाही माहिती मिळू शकलेली नव्हती. शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू झाला आहे.

पहाटे ४ वाजता हा तरुण निशाण साहिबची विटंबना करत होता. गावकरी पोचले, तेव्हा या तरुणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला २ घंट्यांच्या प्रयत्नांनंतर पकडण्यात आले आणि मारहाण करण्यात आली. गावकर्‍यांनी या मारहाणीचे चित्रीकरण करून व्हिडिओदेखील बनवला. गावकर्‍यांनी म्हटले की, त्यांच्या बाजूलाच पोलीस चौकी आहे; मात्र आम्ही या तरुणाला पोलिसांकडे सोपवणार नाही. आम्ही याला आमच्या कह्यात ठेवले असून शीख संघटनांना बोलावले आहे. तेच याचा निर्णय घेतील. हा तरुण देहलीतून आला होता. तरुणानेच सांगितले होते की, त्याला काही पैसे देऊन विटंबना करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त त्याने स्वतःविषयी काहीच सांगितले नाही. तो स्वतःचे नावदेखील सांगत नव्हता.