(म्हणे) ‘भारतात रा.स्व. संघाची ब्राह्मण्यवादी विचारसरणी अल्पसंख्यांकांना बाजूला लोटत आहे !’

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची मुक्ताफळे !

  • पाकने भारतात काय होत आहे, यापेक्षा त्यांच्या देशात अल्पसंख्यांकांचा विशेषतः हिंदूंचा जो वंशसंहार गेली ७४ वर्षे होत आहे, त्याकडे लक्ष देऊन त्यांचे रक्षण करण्याकडे लक्ष द्यावे !
  • पाकमधील जिहादी आतंकवादी, जिहादी विचारसरणी आणि प्रत्यक्ष कृती, हे तेथील अल्पसंख्यांकांना ठार मारत आहे, याविषयी इम्रान खान का बोलत नाहीत ?

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतात जे होत आहे, ते केवळ आमचे किंवा विशेषतः काश्मीरचेच नव्हे, तर हे सर्व भारतियांचे दुर्दैव आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ब्राह्मण्यवादी विचारसरणी भारतातील ५० ते ६० कोटी अल्पसंख्यांक समुदायाला बाजूला लोटत आहे. याचा भारतीय समाजावर गंभीर परिणाम होईल. इतिहास हेच दर्शवतो की, जेव्हा तुम्ही लोकांना वगळता किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करता, तेव्हा तुम्ही त्यांना कट्टरतावादी बनवता, असे विधान पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. ते ‘इस्लामाबाद कॉन्क्लेव्ह २०२१’मध्ये बोलत होते.

खान पुढे म्हणाले की, दक्षिण आशियातील स्थिरतेसाठी काश्मीर हा मोठा धोका आहे. संपूर्ण दक्षिण आशियाला काश्मीरच्या सूत्राने बंधक बनवून ठेवले आहे. मला हे अत्यंत खेदाने सांगावे लागत आहे की, या प्रश्‍नाच्या संदर्भात भारत सरकारशी संवाद साधण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला; परंतु दुसर्‍या बाजूने कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही दूरभाष केला; परंतु हळूहळू आम्हाला याची जाणीव होऊ लागली की, ही आमची दुर्बलता मानली जात आहे. दुर्दैवाने आम्ही एका सामान्य भारत सरकारसमवेत नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी चर्चा करत होतो आणि या विचारधारेशी चर्चा करणे फार कठीण आहे. ज्यांना संघाची विचारसरणी ज्ञात आहे किंवा या संस्थेच्या संस्थापकांची वक्तव्य ऐकली आहेत, अशा लोकांशी चर्चा करणे खरेच कठीण आहे. आम्ही प्रार्थना करतो की, भारतात एक असे सरकार यावे, जे गंभीरतेने पाकिस्तानशी चर्चा करील.