पुणे शहरातील स्वारगेट-हडपसर या मार्गावरील ‘बी.आर्.टी.’ मार्ग (जलद बस वाहतूक मार्ग) सध्या बंद असतांना पुणे महापालिकेच्या पथ विभागाकडून केवळ देखभाल दुरुस्तीसाठी ३० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. मेट्रो मार्गिकेचे विस्तारीकरण होण्यापूर्वी बंद असणार्या या मार्गाची ‘किरकोळ देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे’, असे कारण देत हा निधी खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा हा खर्च म्हणजे केवळ उधळपट्टीच असल्याची टीका होत आहे.
१५ वर्षांपूर्वी देशातील ‘पथदर्शी प्रकल्प’ म्हणून कात्रज ते हडपसर या मार्गावर ‘बी.आर्.टी.’ प्रायोगिक तत्त्वावर चालू केला. अद्यापही हा प्रकल्प अपूर्णच आहे. प्रकल्प राबवणार्या काँग्रेसची महापालिकेतील सत्ता गेली. त्यानंतर आलेल्या राजकीय पक्षांनीही हा मार्ग सुधारण्याची आश्वासने दिली; पण त्यासाठी ठोस उपाययोजना आणि कृती काहीच केली नाही. या ‘बी.आर्.टी.’ला प्रारंभीपासूनच लोकप्रतिनिधींचा विरोध होता. त्या वेळच्या सत्ताधारी राजकारण्यांनी स्वार्थापोटी हा प्रकल्प राबवण्याचा अट्टाहास केला. त्यासाठी ‘करा’पोटी भरलेल्या रकमेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाल्याचे दिसून येत आहे. सोलापूर रस्त्यावरील वाहतुकीला याचा अडथळा होत असल्याचे कारण देत ‘बी.आर्.टी.’ मार्गाची मोडतोड करण्यात आली. तेथील स्थानिक नगरसेवकांनी ‘बी.आर्.टी. मार्ग नकोच’, अशी भूमिका घेतल्याने सध्या शहरातील अनेक मार्ग बंद आहेत. या मार्गातून दुचाकी, खासगी चारचाकी गाड्या जात असून वाहतुकीला अडथळा होत असल्याने ‘बी.आर्.टी.’ मार्ग विकसित करण्यात आलेले सायकल पथ, पदपथ, सेवा रस्ते हटवण्यात आले आहेत. त्यामुळे या ‘बी.आर्.टी.’ मार्गाचे अस्तित्व दिसून येत नसून हा प्रकल्प गुंडाळलेल्या अवस्थेत आहे. यासाठी महापालिकेने १२८ कोटी ४८ लाख रुपय खर्च केले होते. त्यानंतर या मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आतापर्यंत ९० कोटी रुपयांचा खर्च केला आहे. शहरातील अनेक मार्गांची अशीच स्थिती आहे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद आणि संतापजनक आहे.
यावरून महापालिका प्रशासनाचे ढिसाळ नियोजन समोर येत आहे. एका प्रकल्पातील शेकडो कोटी रुपये खर्च करून त्याचा जनतेला काहीही उपयोग नाही. असे असेल, तर महापालिका स्तरावर असे अजून किती प्रकल्प कोट्यवधी रुपये खर्च करून विनावापर पडून आहेत ? याचा अंदाज करू शकत नाही. ‘आंधळ दळतयं आणि कुत्र पीठ खातयं’, अशी अवस्था आहे. यासाठी राष्ट्रप्रेमी आणि प्रामाणिक व्यक्ती शासकीय अन् प्रशासकीय स्तरावर हव्यात, हे नक्की !
– श्री. अमोल चोथे, पुणे