नाशिक येथील मराठी साहित्य संमेलनावर कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ विषाणूचे सावट !

लस घेतली तरच प्रवेश !

कुसुमाग्रजनगरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सज्ज पण . . .

नाशिक – येथील ‘भुजबळ नॉलेज सिटी’मधील कुसुमाग्रजनगरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सज्ज झाली आहे. संमेलन अवघ्या २ दिवसांवर आले असतांना जगभरात धास्ती निर्माण करणार्‍या कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ विषाणूचे साहित्य संमेलनावरही सावट पसरले आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असणार्‍यांनाच संमेलनात प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. संमेलनाचे आयोजन आणि निर्बंध याविषयी पुन्हा विचारविनिमय चालू झाला आहे.

साहित्य संमेलनाच्या मुख्य सभामंडपाची क्षमता १४ सहस्र आहे; मात्र आयोजकांनी ती आता सुरक्षित अंतर पालनासह ७ सहस्रांवर आणण्याची सिद्धता चालू केली आहे. समवेतच किमान लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना संमेलनात प्रवेश असेल. संमेलनस्थळीच डोस दिला जाणार आहे. साहित्य संमेलन आणि ‘ओमिक्रॉन’ विषाणू या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तातडीची बैठक बोलावली असून नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर संमेलनस्थळी कठोर निर्बंध घालण्याचे संकेत जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. शिवाय इतर महत्त्वाचे निर्णयही होऊ शकतात.