(म्हणे) ‘निवडणुकीत ३५ टक्के जागांवर ख्रिस्ती उमेदवार उभे करा !’

वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांची भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

धर्माच्या आधारावर अशी मागणी करणे धर्मनिरपेक्ष लोकशाहीत बसते का ?

आमदार कार्लुस आल्मेदा यांनी वास्को येथे घेतलेली पत्रकार परिषद

वास्को, २८ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यात अल्पसंख्यांक ख्रिस्ती समाजाला भाजपने आतापर्यंत निवडणुकीत दिलेली संधी पक्षाला फलदायी ठरली आहे. मागील दोन्ही निवडणुकीत ख्रिस्ती उमेदवारांनी भरीव यश प्राप्त केले आहे. सद्यःस्थितीत भाजपकडे १४ ख्रिस्ती आमदार आहेत. राज्य विधानसभेत भाजपच्या ख्रिस्ती आमदारांचे बळ पहाता येत्या निवडणुकीत भाजपने ३५ टक्के जागा ख्रिस्ती उमेदवारांना देणे योग्य ठरेल, असा दावा वास्को मतदारसंघाचे भाजपचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी केला आहे. आमदार कार्लुस आल्मेदा यांनी या आशयाचे पत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी लिहिले आहे. आमदार कार्लुस आल्मेदा यांनी वास्को येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

आमदार कार्लुस आल्मेदा आगामी निवडणुकीत ख्रिस्ती आमदारांना भाजपने झुकते माप का द्यावे ? याविषयी अधिक माहिती देतांना म्हणाले, ‘‘माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी वर्ष २०१२ मध्ये सर्वांना सामावून घेण्यासाठी ख्रिस्त्यांना संधी देण्याचे धोरण अवलंबले. या धोरणाला पाठिंबा देतांना

५ ख्रिस्ती आमदार निवडून आणले, तसेच भाजपच्या पाठिंब्यामुळे २ अपक्ष उमेदवारही निवडून आले. त्यानंतर भाजपने मागील निवडणुकीत ८ ख्रिस्ती उमेदवारांना संधी दिली. भाजपचे मागील निवडणुकीत १३ आमदार निवडून आले, तरी यातील ७ आमदार हे ख्रिस्ती होते.

भाजपने ख्रिस्ती उमेदवारांना योग्य संधी देण्याचा निर्णय दोन्ही वेळा फलद्रूप झालेला आहे. वर्ष २०१९ मध्ये काँग्रेसच्या १० आमदारांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यातील ८ आमदार ख्रिस्ती होते. त्यामुळे भाजप गोव्यात अधिक बळकट झाला. आज भाजपकडे १४ आमदार ख्रिस्ती आहेत. संधी देण्याचे महत्त्व यातून लक्षात येते. भाजपकडे असलेल्या ख्रिस्ती आमदारांचे विधानसभेतील ३५ टक्के बळ पहाता येत्या निवडणुकीत पक्षाने ३५ टक्के जागा ख्रिस्ती उमेदवारांना द्यायला पाहिजेत. या कृतीतून समाजात योग्य तो संदेश जाईल आणि भाजप अधिकाधिक जागा जिंकू शकेल.’’