कुडाळ – तालुक्यातील पिंगुळी येथील श्री. दीप संजय जोशी यांनी ‘रमल विशारद’ या पदवी परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. पुणे येथील ‘भालचंद्र ज्योतिर्विद्यालय’, या संस्थेद्वारे याविषयी १७ ऑक्टोबर २०२१ या दिवशी ‘ऑनलाईन’ परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन ‘रमल विशारद’ पदवी प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र संस्थेद्वारे श्री. दीप जोशी यांना ‘ऑनलाईन’ प्रदान करण्यात आले. ‘रमल विशारद’ या पदवीसाठी ‘भालचंद्र ज्योतिर्विद्यालया’चे अध्यापक तथा ‘रमल तज्ञ’ श्री. चंद्रकांत शेवाळे यांचे श्री. जोशी यांना मार्गदर्शन लाभले. तसेच ‘श्री स्वामी समर्थ गणेश चॅरिटेबल ट्रस्ट, सातारा’ द्वारा संचलित ‘मराठी ज्योतिषी मंडळ, महाराष्ट्र राज्य’द्वारे घेण्यात आलेला ‘पंचांग पारंगत’ हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याविषयी श्री. जोशी यांना ‘पंचांग पारंगत’ प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
या यशाविषयी कृतज्ञता व्यक्त करतांना श्री. जोशी यांनी सांगितले, ‘‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादामुळे मी हे यश मिळवू शकलो. हे यश परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करतो.’’
रमल शास्त्र
भूत, भविष्य आणि वर्तमान ज्ञात होण्याकरिता भगवान शंकरांनी पार्वती मातेला जे ज्ञान प्राप्त करून दिले, त्याला ‘रमल शास्त्र’ म्हणतात. या अद्भुत विद्येचा उपयोग द्वापर युगापासून केला जात आहे. रमल कुंडलीच्या सर्व स्थानांद्वारे प्रश्नांची उत्तरे कशी शोधावीत, हे अभ्यासले जाते.