कार्तिकी यात्राकाळात यात्रेकरू न्यून येऊनही मंदिर समितीच्या उत्पन्नात वाढ !

श्री विठ्ठल-रुक्मिणी

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कार्तिकी यात्राकाळात यंदा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला विविध देणग्या, छायाचित्र विक्री, भक्त निवास भाडे, अशा सर्व माध्यमांतून पुष्कळ उत्पन्न मिळाले आहे. यंदा एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपामुळे यात्रेकरू अपेक्षित संख्येने येऊ शकले नाहीत; मात्र तरीही मागील वर्षींच्या तुलनेत यंदा मंदिर समितीच्या उत्पन्नात १ कोटी ८४ लाख ८९ सहस्र ४२४ रुपयांची वाढ झाली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

कोरोनाच्या संसर्गामुळे मागील २० मास पंढरपूर येथे कोणतीही यात्रा झाली नाही.  कोरोनाच्या रुग्णांची संख्या न्यून झाल्याने यंदा कार्तिकी यात्रा भरली; मात्र एस्.टी.  कर्मचार्‍यांच्या संपाचा यात्रेवर लक्षणीय परिणाम झाला. बाजारपेठेतही अपेक्षित उलाढाल झाली नाही. यंदा यात्राकाळात अपेक्षेच्या तुलनेने यात्रेकरू कमी आले; मात्र तरीही मागील वर्षीच्या तुलनेत मंदिर समितीचे उत्पन्न वाढले आहे.