शबरीमला मंदिरातील ‘अरावणा पायसम’ हा प्रसाद मंदिराचे कर्मचारीच सिद्ध करतात ! – केरळ देवस्वम् मंडळाचे स्पष्टीकरण

शबरीमला मंदिराचा ‘अरावणा पायसम’ हा प्रसाद ‘अल् झहा’ या अरबी नावाने आणि ‘हलाल’ प्रमाणित करून मंदिर परिसरात कुठून उपलब्ध होतो ?, हा प्रश्‍न अनुत्तरित रहातो. ‘हिंदूंच्या मंदिरांचा प्रसाद मुसलमान व्यक्तीकडून बनवला जातो’, असा प्रसार करून कुणी त्याविरोधात षड्यंत्र रचले आहे का ? याची केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार चौकशी करणार का ?

‘अरावणा पायसम’ हा प्रसाद सिद्ध करण्याचे कंत्राट अरबी आस्थापनाला दिलेले नाही – केरळ देवस्वम् मंडळ

थिरूवनंतपूरम् (केरळ) – शबरीमला मंदिरात मिळणारा ‘अरावणा पायसम’ हा पारंपरिक गोड प्रसाद मंदिराचे कर्मचारीच सिद्ध करतात; केवळ तांदूळ आणि गुळ पुरवण्याचे कंत्राट बाहेर दिले जाते, असे स्पष्टीकरण केरळ देवस्वम् मंडळाच्या कार्यकारी अधिकार्‍याने दिले.

‘केरळ देवस्वम् मंडळाने शबरीमला मंदिरात मिळणारा ‘अरावणा पायसम’ हा प्रसाद सिद्ध करण्याचे कंत्राट एका मुसलमान व्यक्तीला दिले आहे. या प्रसादाला ‘अल् झहा’ असे अरबी नाव देण्यात आले असून त्यावर ‘हलाल’ असा उल्लेख आहे’, असे वृत्त सर्वत्र पसरले होते. त्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याविषयी स्पष्टीकरण देतांना शबरीमला मंदिरातील ‘अरावणा पायसम’ हा प्रसाद सिद्ध करण्याचे कंत्राट अरबी आस्थापनाला दिले नसल्याचे या अधिकार्‍याने सांगितले. अशा प्रकारचा प्रसाद अन्य कुणीही बनवून त्याची विक्री करू शकतो, असेही सांगण्यात येत आहे.