नागपूर – अमरावती येथील घडलेली घटना ही रझा अकादमी आणि इतर ६ संघटना यांनी घडवून आणली आहे. त्रिपुराच्या कथित घटनेच्या विरोधात एकत्रित येण्याचे आवाहन करून षड्यंत्र रचत हा हिंसाचार घडवला गेला. त्यामुळे रझा अकादमीवर बंदी आणून इतर सर्व संघटनांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहोत, अशी माहिती विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी १४ नोव्हेंबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
परांडे पुढे म्हणाले की,
१. ज्या वेळी समुदाय इतक्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला होता, त्या वेळी पोलीस आणि प्रशासन कुठे गेले होते ? तेच दुसर्या दिवशी काही समाजबांधव रस्त्यावर उतरले असतांना त्यांच्यावर मात्र लाठीमार करण्यात आला, तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. ही कृती अयोग्य आहे.
२. ‘रझा अकादमीचा इतिहास वादग्रस्त आहे. वर्ष २०१२ मध्ये मुंबई येथील आझाद मैदानावर जी दंगल झाली, त्या वेळीही मोठ्या संख्यने समूह एकत्रित आला होता. अमरावती किंवा अन्य काही भागांत घटना घडल्या, तेव्हा पोलीस प्रशासनाला याविषयी काहीच पूर्वसूचना मिळाली नाही. त्यांना काहीच कसे कळले नाही ?
३. रझा अकादमी आणि इतर संघटना यांच्याविरुद्ध हिंसाचाराचे गुन्हे नोंद केले पाहिजेत. या विरोधात विश्व हिंदु परिषदेच्या वतीने तक्रारी प्रविष्ट करण्यात येणार आहेत.