श्री तुळजाभवानीदेवीचे बनावट संकेतस्थळ सिद्ध करून भाविकांची लूट !

श्री तुळजाभवानीदेवी

धाराशिव – श्री तुळजाभवानीदेवीचे बनावट संकेतस्थळ सिद्ध करून भक्तांना गंडा घातला जात असल्याची माहिती समोर आली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीच्या भक्तांना फसवण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

श्री तुळजाभवानी मंदिराचे  www.shrituljabhavani.org असे अधिकृत संकेतस्थळ आहे. अज्ञात भामट्याने www.tuljabhavani.in या नावाने बोगस संकेतस्थळ चालू केले. या  संकेतस्थळावरून श्री तुळजाभवानीदेवीचे दर्शन, अभिषेक, प्रसाद, पूजा, जागरण-गोंधळ यांसाठी भक्तांकडून पैसे वसूल केले जात आहेत. या प्रकाराविषयी ‘श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान’ काहीच बोलायला सिद्ध नाही. त्यामुळे या प्रकरणातील संशय आणखी वाढला आहे. (मंदिर सरकारीकरणामुळे निर्माण झालेली आणखी नवी समस्या ! भक्तांकडून पैसे उकळले जात असूनही मंदिर समिती या प्रकरणाकडे गांभीर्याने पहायला सिद्ध नाही. यावरूनच सरकारीकरण झालेल्या मंदिरांचा कारभार कसा चालू असेल ? याची कल्पना येते. त्यामुळे मंदिरे भक्तांच्याच कह्यात असायला हवीत. – संपादक)

संकेतस्थळावर ‘तुळजाभवानी टेम्पल’ या शब्दाने शोध घेतल्यानंतर ‘विकीपिडिया’मध्ये (‘ऑनलाईन विश्वकोषा’मध्ये) जी माहिती उपलब्ध होते, त्यामध्ये याच बोगस संकेतस्थळाची लिंक देण्यात आली आहे. त्यामुळे भक्तांची फसवणूक होत आहे. ‘याविषयी धाराशिवच्या जिल्हाधिकार्‍यांकडे रीतसर तक्रार करूनही प्रशासन कारवाई करत नाही’, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. श्री तुळजाभवानीदेवीच्या नावे ४ बोगस संकेतस्थळे चालू असल्याची आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘याविषयीचे अहवाल सायबर पोलिसांकडे देण्यात येतील’, असे तहसीलदार रोहन शिंदे यांनी सांगितले.