कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्यावर साधकाने अनुभवलेली परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा !

श्री. पवन बर्वे

१. कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्यावर कोणतेही दडपण न येता देवाला शरण जाऊन नामजप करणे

‘एप्रिल २०२१ मध्ये मला ताप येणे आणि पाय वळणे, असे त्रास होऊ लागले. २ ते ३ दिवसांनी बरे वाटले; पण पुन्हा ताप, सर्दी आणि खोकला चालू झाला. त्यानंतर कोरोना चाचणी केल्यावर अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. त्या वेळी माझ्या मनावर कोणतेही दडपण नव्हते. माझ्याकडून देवाला शरण जाणे आणि नामजप करणे आपोआप होऊ लागले.

२. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने रुग्णालयात चांगले उपचार मिळणे

त्यानंतर २ दिवसांनी मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला; म्हणून पुन्हा एका खासगी रुग्णालयात जाऊन मी ‘सीटी स्कॅन’ (CT Scan) केले. चाचणी झाल्यावर त्रास वाढल्याचे समजल्यावर मी सरकारी रुग्णालयात भरती झालो. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने रुग्णालयात चांगले उपचार मिळाले.

३. रुग्णालयात भरती होण्याच्या आधी आणि घरी आल्यावरही सत्मध्ये राहिल्याने घरात सात्त्विकता अनुभवता येणे

अ. रुग्णालयात भरती होण्याच्या आधी मी देवाच्या कृपेने एका पुरोहिताकडून दुर्गासप्तशती पाठाचे वाचन करवून घेतले. त्यानंतर रुग्णालयातून घरी परत आल्यावर परात्पर गुरुमाऊलीच्या जन्मोत्सवाच्या सोहळ्याचे प्रक्षेपण पहायला मिळाले, ही खरी देवाची कृपा !

आ. चार दिवसांनी त्याच पुरोहितांनी घरातील सर्वांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी ‘ज्वर शांती’ करायला सांगितली. देवाच्या कृपेने शांती चांगली झाली. ‘शांती करतांना अग्नीमध्ये अमृत दलाच्या, म्हणजे आंब्याच्या पानांची आहुती देत असतांना ‘प्रत्येक पान अग्नी लगेच स्वीकारत आहे’, हे पाहून माझी भावजागृती झाली. शांती झाल्यानंतर घरातील सर्वांनीच शांती आणि सात्त्विकता अनुभवली.

हे सर्व गुरुमाऊलीच्या कृपेने झाले आणि माझे आरोग्य चांगले झाले. यासाठी गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो आणि ‘यापुढील साधना त्यांच्याच कृपेने होऊ दे’, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. पवन बर्वे, वाळपई, गोवा. (एप्रिल २०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक