बांगलादेशचे नवे नाव ‘जिहादीस्तान’ असून पंतप्रधान शेख हसीना त्याची राणी आहेत !

बांगलादेशी हिंदूंवरील आक्रमणांवरून बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांची निष्क्रीय पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर कठोर टीका !

भारतातील एक तरी हिंदु साहित्यिक, लेखक, खेळाडू आदी, तसेच निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाचा निषेध करत आहे का ? त्या तुलनेत तस्लिमा नसरीन हिंदूंना जवळच्या वाटतात ! – संपादक 

तस्लिमा नसरीन

नवी देहली – बांगलादेशचे नवे नाव ‘जिहादीस्तान’ आहे. संपूर्ण देशात जिहाद्यांकडून हिंदूंचे पूजा मंडप, देवतांच्या मूर्ती, मंदिरे, घरे आणि दुकाने यांची तोडफोड करण्यात आली. पंतप्रधान शेख हसीना यांनी प्रसारमाध्यमांना गप्प बसण्यास सांगितले आहे. शेख हसीना आता जिहाद्यांची आई आणि जिहादीस्तानची राणी बनल्या आहेत, अशा कठोर शब्दांत बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर टीका केली.

१. याविषयी तस्लिमा नसरीन यांनी एकूण ३ ट्वीट्स केले आहेत. दुसर्‍या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, बांगलादेशातील सहस्रो लोक बेघर झाले असून त्यांची घरे जाळण्यात आली आहेत. अशा वेळी पंतप्रधान शेख हसीना त्यांचा भाऊ शेख रसेल याचा वाढदिवस साजरा करत आहेत. (एकीकडे ‘हिंदूंवर आक्रमण करणार्‍यांना कठोर शिक्षा करू’, असे म्हणणार्‍या हसीना यांच्या राजवटीत प्रत्यक्षात मात्र हिंदूंवरील आक्रमणे थांबलेली नाहीत, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक)

२. तिसर्‍या ट्वीटमध्ये नसरीन यांनी लिहिले, ‘‘बांगलादेशातील पीरगंज आणि रंगपूर ही दोन गावे जाळून टाकण्यात आली, तरी हसीना ‘बासरी’ वाजवत आहेत (गप्प बसल्या आहेत).’ या गावांतील हिंदूंची ६६ घरे जाळण्यात आली. यात ४० हिंदू घायाळ झाले होते.’’

३. दोन दिवसांपूर्वी नसरीन यांनी ‘महंमद पैगंबर यांचे अनुयायी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आहेत. पैगंबर यांनी काबा येथील मूर्तीपूजकांच्या ३६० मूर्तींची तोडफोड केली होती. त्यांचे अनुयायीही हेच करत आहेत’, असे ट्वीट केले होते.


(म्हणे) ‘हिंदूंनी स्वतःच त्यांची मंदिरे आणि घरे यांना आग लावली !’

बांगलादेशातील प्रसारमाध्यमांचे खोटे वृत्त

भारतातील हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे आणि बांगलादेशातील प्रसारमाध्यमे एकाच माळेचे मणी आहेत, हे जाणा ! – संपादक 

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात सातत्याने हिंदूंवर आक्रमणे होत असली, तरी तेथील प्रसारमाध्यमे हे वृत्त दडपण्यासह ‘हिंसाचाराला हिंदूच उत्तरदायी आहेत’, असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. बांगलादेशी प्रसारमाध्यम ‘बाँसेरकेल्ला’ने एका जाळण्यात येत असलेले मंदिर आणि हिंदूंची घरे यांचा एक व्हिडिओ प्रसारित करून ‘हिंदूंनी स्वतःच हे मंदिर आणि त्यांची घरे जाळली’, असे सांगितले. ‘बाँसेरकेल्ला’ने ट्वीट करून म्हटले की, स्थानिक लोकांच्या माहितीनुसार रंगपूरच्या पीरगंज येथे हिंदूंनी बांगलादेशाची प्रतिमा डागाळण्यासाठी स्वतःच स्वतःच्या घरांना आग लावली.