बांगलादेशमध्ये धर्मांधांनी आतापर्यंत हिंदूंवर केलेली आक्रमणे
|
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात गेल्या काही दिवसांत झालेल्या हिंदूंवरील आक्रमणांत १२ हिंदूंच्या हत्या, १७ हिंदू अद्याप बेपत्ता, २३ हिंदु मुली आणि महिला यांवर बलात्कार, तर १६० पूजा मंडप अन् मंदिरे यांवर आक्रमणे झाल्याची माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’च्या बांगलादेश शाखेने जाहीर केली आहे.
१. ताज्या आक्रमणांमध्ये चांदपूरच्या हाजीगंजमध्ये माणिक साहा; नोआखालीच्या चौमोहनीमध्ये पुजारी जतन साहा, इस्कॉन मंदिराचे निमाई कृष्ण, तसेच अन्य एक पुजारी; राम ठाकुर आश्रमाचे ३ पुजारी; कॉमिलामध्ये प्रशांत दास आणि कॉक्स बाजार येथील रामू दुर्गा मंदिरामध्ये एक हिंदू अशा ९ हिंदूंची हत्या करण्यात आली.
२. कॉमिला जिल्ह्यातील नृसिंह देव मंदिर, दशभुजा काली मंदिर, ऋषिपरा मंदिर, राजेश्वरी काली मंदिर, तसेच अन्य १४ मंदिरे आणि पूजा मंडप यांवर आक्रमणे करून त्यांची तोडफोड अन् जाळपोळ करण्यात आली.
३. चटगाव जिल्ह्यात १५ पूजा मंडप उद्ध्वस्त करण्यात आले. तसेच काली मंदिरावर आक्रमण करण्यात आले.
४. नोआखाली येथे इस्कॉनचे मंदिर, राम ठाकुर आश्रम यांच्यासह १० मंदिरांची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली. चौमोहनीमध्ये ९ मंदिरांवर आक्रमणे करण्यात आली. नलचिरा येथे ५ मंदिरांवर आक्रमणे करण्यात आली. तसेच येथे २० हिंदु घरांना आग लावण्यात आली. चयनीबाजार, बेगमगंज, चौमोहनी आणि सोनैमुरी येथे सर्व हिंदूंची घरे जाळण्यात आली.