शेतकरी अडचणीत का ?

ओला आणि सुका दुष्काळ, कर्जबाजारी आणि सावकारी यांमुळे गेल्या १५ वर्षांमध्ये शेतकर्‍यांनी मानसिक ताण घेऊन आत्महत्या केल्या आहेत. वर्षांतील १० मास शेतकर्‍याला दिवस-रात्र घाम गाळूनही अपेक्षित असा आर्थिक लाभ होत नाही आणि त्यातून तो आत्महत्येकडे वळतो, हे दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. शेतकरी मागास का रहात आहे ? आणि त्याला सक्षम कसे करायला हवे ? याचा विचार होणे आवश्यक आहे.

शेतकरी मागास रहाण्यामध्ये अनेक कारणे आहेत. त्यामध्ये पारंपरिक शेतीवर अधिक भर, उत्तम प्रकारचे बी उपलब्ध नसणे, शेतीसमवेत जोडधंदा न करणे, दुष्काळी भागांत पाण्याचे योग्य नियोजन न होणे, विविध सरकारी योजना प्रत्येक शेतकर्‍यांपर्यंत न पोचणे, त्या योजना शेतकर्‍यांपर्यंत पोचवण्यात प्रशासन एका टप्प्यापर्यंत अयशस्वी असणे, सेंद्रिय खतांचा वापर सोडून रासायनिक खतांचा वापर अधिक प्रमाणात करणे, शेतकर्‍यांनी पिकवलेल्या शेतमालाला सरकारकडून योग्य भाव न मिळणे, शेतमाल विकण्यास बाजारपेठ उपलब्ध न होणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे निसर्गाची साथ नसणे आदी कारणांचा समावेश आहे. अशा अनेक कारणांमुळे कृषीप्रधान भारतामध्ये शेतकरी मागासलेला आहे. एकेकाळी सोन्याचा धूर निघणार्‍या भारतामध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्या होणे आणि शेतकरी हतबल होणे, हे सर्वपक्षीय शासनकर्ते अन् प्रशासन यांना लज्जास्पद नव्हे का ?

शासनकर्त्यांमध्ये शेतकर्‍यांच्या समस्यांचा संवेदनशीलतेने अभ्यास करून त्यांच्या समस्या वेळेत आणि तत्परतेने सोडवण्याची जिद्द निर्माण होणे आवश्यक आहे. ही जिद्द निर्माण झाल्यास वेगवेगळ्या उपाययोजना मिळू शकतात आणि खर्‍या अर्थाने साहाय्य करता येऊ शकेल. असे झाले तरच शेतकर्‍यांच्या समस्या खर्‍या अर्थाने सुटतील. असे शासनकर्ते मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याविना पर्याय नाही.

– श्री. सचिन कौलकर, मुंबई.