धर्मशिक्षणाच्या अभावी होणार्‍या चुका टाळून नवरात्रीच्या कालावधीत योग्य ती साधना करा !

पू. तनुजा ठाकूर

१. ‘नवार्ण’ हा तेजतत्त्वाशी संबंधित मंत्राचा जप केल्याने स्त्रियांना जननेद्रियांच्या संबंधित त्रास होऊ शकत असल्याने त्यांनी हा मंत्रजप करणे टाळावे !

‘नवरात्रीच्या कालावधीत काही स्त्रिया ‘नवार्ण’ मंत्राचा जप करतात. हा मंत्र तेजतत्त्वाशी संबंधित असल्याने ज्या स्त्रियांची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अल्प आहे, त्यांना हा मंत्रजप केल्याने विशेषतः जननेद्रियांच्या संबंधित त्रास होऊ शकतात. ‘नवार्ण’ मंत्राचा जप करणार्‍या १३ ते ५० वर्षे या वयोगटातील स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी अतिशय त्रास झाल्याचे मी प्रत्यक्षात बघितले आहे. त्यामुळे स्त्रियांनी हा मंत्रजप करणे टाळावे.

२. स्वतःच्या मनाने तेजोपासना केल्याने एका चिकित्सकांना झालेले त्रास आणि पृथ्वीतत्त्वाची साधना आरंभ केल्यावर त्यांना झालेला लाभ

भाव नसलेल्या पुरुषांची आध्यात्मिक पातळी उच्च नसल्यास त्यांनासुद्धा हा मंत्रजप अधिक प्रमाणात केल्यास त्रास होऊ शकतात. सप्टेंबर १९९९ मध्ये झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात मी ४५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या एका चिकित्सकांना भेटले. ते स्वतःच्या मनाने तेजोपासना करत होते. त्यांच्यात शक्तीतत्त्वाची मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे ते पुष्कळ अस्थिर असत. त्यांना पुष्कळ घाम येत असे, तसेच त्यांना रागही येत असे.

मी त्यांना ही साधना काही काळासाठी बंद करून पृथ्वीतत्त्वाची साधना करण्यास सांगितले. त्यानंतर ३ – ४ मासांत त्यांच्या ‘अस्थिरता, घाम येणे, राग येणे’, यांसारख्या लक्षणांत पालट दिसू लागला. त्यांच्यातील हा पालट बघून त्यांच्या संपूर्ण परिवाराने साधना करण्यास प्रारंभ केला.

३. ‘नवार्ण’ मंत्राऐवजी ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप करणे, हे अध्यात्मशास्त्रानुसार योग्य आहे. जर एखाद्या व्यक्तीचा अजपाजप (आपोअप नामजप होणे) होत असेल, तर ती व्यक्ती ‘ॐ श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप करू शकते.

४. ‘चंडीपाठ’ अयोग्य पद्धतीने केल्यास त्रास होऊ शकणे

‘चंडीपाठ’ अयोग्य पद्धतीने केला, तर त्रास होऊ शकतो; म्हणून संस्कृत वाचता येत नसेल, तर चंडीपाठ करू नये. विशेषतः भाव नसलेल्या स्त्रियांनीही ‘चंडीपाठ’ करणे टाळले पाहिजे. चंडीपाठ म्हणतांना ‘विशिष्ट पद्धतीने उच्चार कसे करायचे ?’, ते सांगितले आहे. ते उच्चार त्याच पद्धतीने झाले पाहिजेत.

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे अनेक घरात अशा चुका होतांना मी बघितल्या आहेत आणि त्यांचे वाईट परिणाम सूक्ष्मातून अनुभवले आहेत.’

– पू. तनुजा ठाकूर (१२.१०.२०२१)